नागरी विमानन संचालनालयाने (DGCA) शनिवारी (१७ जानेवारी २०२६) इंडिगो एअरलाइन्सवर २२.२ कोटी रुपयांचा मोठा दंड लादला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये इंडिगोच्या विमानांची उड्डाणे मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. या घटनेच्या चौकशीत असे समोर आले की, विमान कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांकडून क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेतले, ज्यामुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडली.
डीजीसीएने या प्रकरणी केवळ दंडच लावला नाही, तर इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि सीओओ इसिड्रे पोर्क्वेरास यांना कारणे दाखवा नोटीस बजावत कडक ताकीद दिली आहे. तसेच, ऑपरेशनल कंट्रोल सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष जेसन हर्टर यांना त्यांच्या पदावरून तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. १ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या वैमानिकांच्या सुधारित कामाच्या आणि विश्रांतीच्या नियमांची (FDTL) अंमलबजावणी करण्यात हर्टर अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
चौकशी समितीला असे आढळले की, इंडिगो व्यवस्थापनाचा संपूर्ण भर विमान आणि कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर होता. नफा कमवण्यासाठी रोस्टरमध्ये कोणताही 'बफर मार्ग' (राखीव वेळ) ठेवण्यात आला नव्हता. विमानांची आदलाबदल करणे आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवणे यांसारख्या पद्धतींमुळे वैमानिकांवर प्रचंड ताण आला. यामुळे केवळ कर्मचाऱ्यांचे वेळापत्रकच बिघडले नाही, तर विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेवरही परिणाम झाला.
या चौकशीतून इंडिगोच्या व्यवस्थापन रचनेत आणि सॉफ्टवेअर प्रणालीमध्येही अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नवीन नियमांनुसार इंडिगोकडे आवश्यकतेपेक्षा ६५ कॅप्टन्स कमी असल्याचेही उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सूचनेनुसार डीजीसीए आता स्वतःची अंतर्गत चौकशीही करणार आहे. इंडिगोकडे पुरेसे मनुष्यबळ नसतानाही त्यांना हिवाळी वेळापत्रकात १० टक्के जादा उड्डाणांची परवानगी कशी दिली गेली, या प्रश्नाचे उत्तर या चौकशीतून शोधले जाईल.
इंडिगोला यापुढे नियमांचे पालन करण्यासाठी ५० कोटी रुपयांची बँक गॅरंटी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमान कंपनीने नेतृत्व, मनुष्यबळ नियोजन, थकवा-जोखीम व्यवस्थापन आणि डिजिटल प्रणालीमध्ये सुधारणा केल्याचे सिद्ध झाल्यानंतरच ही रक्कम त्यांना परत केली जाईल. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा यांशी कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा डीजीसीएने या कारवाईद्वारे दिला आहे.