INS तमाल : भारताने आयात केलेली शेवटची युद्धनौका ताफ्यात होणार दाखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

रशियात तयार करण्यात आलेली 'आयएनएस तमाल' ही युद्धनौका येत्या एक जुलै रोजी नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. रशियातील कालिनीनग्राड येथे या नौकेचे अनावरण होईल. 'आयएनएस तमाल' युद्धनौकेत वापरण्यात आलेले २६ टक्के सुटे भाग देशी बनावटीचे आहेत. ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असलेली 'आयएनएस तमाल' ही देशाने आयात केलेली अखेरची युद्धनौका ठरणार आहे.

रशियातील यानंतर या गोदीमध्ये 'आयएनएस तमाल' ची बांधणी करण्यात आलो आहे. ही बहुपयोगी आणि लक्ष्याचा अचूक वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली युद्धनौका आहे. पाणबुड्यांचा मुकाबला करण्याच्यादृष्टीने या युद्धनौकेची विशेष रचना करण्यात आली आहे. यामध्ये पाण्याखालून मारा करता येणारी क्षेपणास्त्रे आणि पाणतीर यांचाही यात अंतर्भाव आहे. या युद्धनौकेवर एक हेलिकॉप्टर तैनात करण्याचीही सुविधा आहे.

रडारला चकमा देण्याची क्षमता
शत्रू देशाच्या रडार प्रणालीला चकमा देण्याची क्षमता 'आयएनएस तमाल 'मध्ये आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र डागण्याची सुविधा असलेल्या या युद्धनौकेत अत्याधुनिक रडार सेन्सर प्रणाली बसवण्यात आली आहे. 'आयएनएस तमाल'च्या अनावरण समारंभास नौदलाच्या पश्चिम कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाइस ऍडमिरल संजय सिंह यांच्यासह भारत आणि रशियाचे वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दुसरी युद्धनौका
तलवार दर्जाच्या चार युद्धनौका बनवण्यासाठी भारत आणि रशिया यांच्यादरम्यान २०१६ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. यातील दोन युद्धनौका भारतात तर दोन रशियात बनवल्या जाणार होत्या. या करारानुसार रशियात बनवली जात असलेली ही दुसरी युद्धनौका आहे. आयएनएस तुशिला ही पहिली युद्धनौका आधीच नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. 

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत भविष्यात देशातच युद्धनौकांची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्यामुळे 'आयएनएस तमाल' ही विदेशातून आयात केली जाणारी अखेरची युद्धनौका ठरणार आहे. भारतात बनवल्या जाणाऱ्या दोन युद्धनौकांची बांधणी गोवा येथील शिपयार्डमध्ये सुरू आहे. यातील पहिली युद्धनौका 'आयएनएस त्रिपुट'ला समुद्र परीक्षणासाठी पाण्यात उतरवण्यात आले होते.