रेल्वे आरक्षण तक्ता आता ८ तास आधीच

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 21 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण तक्ते आता प्रवासाच्या आठ तास आधीच तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हा तक्ता चार तास आधी तयार होतो. दूरच्या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. रेल्वेमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी सध्याच्या चार तासांऐवजी गाडी सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण तक्ता तयार करण्यासाठी काम करत आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
 
या निर्णयामुळे दुर्गम भागातून किंवा मोठ्या शहरांच्या उपनगरांमधून लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल. तसेच, प्रतीक्षा यादीतील तिकीट निश्चित न झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यासाठी त्यांना अधिक वेळ मिळेल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

नवीन सुधारित प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) मुळे प्रति मिनिट १.५ लाख पेक्षा जास्त तिकिटे आरक्षित करता येतील. सध्याच्या प्रणालीमध्ये प्रति मिनिट केवळ ३२,००० तिकिटे आरक्षित होतात, त्यामुळे यात अंदाजे पाच पटीने वाढ होईल, असेही मंत्रालयाने सांगितले. नवीन प्रणाली बहुभाषिक आणि वापरण्यास सोपी अशी बुकिंग व चौकशी इंटरफेससह उपलब्ध असेल. यामध्ये प्रवासी त्यांच्या पसंतीची जागा निवडू शकतील आणि भाडे तक्ता पाहू शकतील. तसेच, दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांसाठीही यात एकात्मिक सुविधा असतील, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

१ जुलै २०२५ पासून भारतीय रेल्वे आयआरसीटीसी (IRCTC) च्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर केवळ अधिकृत वापरकर्त्यांनाच तात्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी देईल, असे मंत्रालयाने जाहीर केले आहे. तसेच, जुलैच्या अखेरीस तात्काळ बुकिंगसाठी ओटीपी-आधारित प्रमाणीकरण (Authentication) केले जाईल, यावरही मंत्रालयाने भर दिला आहे.

रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ बुकिंगसाठी प्रमाणीकरण यंत्रणा अधिक व्यापक करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. आधार किंवा वापरकर्त्याच्या डिजीलॉकर खात्यात उपलब्ध असलेले इतर कोणतेही पडताळणीयोग्य सरकारी ओळखपत्र वापरून प्रमाणीकरण केले पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाच्या मते, ही पाऊले रेल्वेच्या प्रणालींचे आधुनिकीकरण आणि त्या अधिक नागरिक-स्नेही बनवण्याच्या सततच्या प्रयत्नांना दर्शवतात.