"ज्या दिवसापासून इस्लाम भारतात आला, तो येथे आहे आणि येथेच राहील. इस्लाम नाहीसा होईल असे वाटणारे लोक हिंदू विचारांनी प्रेरित नाहीत," असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी व्यक्त केले. दिल्लीत संघाच्या शताब्दी सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
"हिंदू तत्त्वज्ञान असा विचार करत नाही. जेव्हा दोन्ही बाजूंमध्ये विश्वास निर्माण होईल, तेव्हाच हा (हिंदू-मुस्लीम) संघर्ष संपेल. सर्वप्रथम, आपण सर्वांनी हे स्वीकारले पाहिजे की आपण सर्व एक आहोत," असे भागवत म्हणाले.
'घुसखोरी' ही एक समस्या
'घुसखोरी' ही देशापुढील एक मोठी समस्या असून ती थांबवली पाहिजे, असे सांगताना भागवत म्हणाले की, "बाहेरून येणारे लोक मुस्लिमांच्याही नोकऱ्या हिसकावून घेत आहेत." "घुसखोरी थांबलीच पाहिजे. सरकार काही प्रयत्न करत आहे आणि हळूहळू पुढे जात आहे. आपल्या देशात राहणारे मुस्लिमही नागरिक आहेत. त्यांनाही रोजगाराची गरज आहे. जर तुम्हाला मुस्लिमांना नोकऱ्या द्यायच्या असतील, तर त्या आपल्या नागरिकांना द्या. बाहेरून येणाऱ्यांना का द्यायच्या? त्यांच्या देशांनी त्यांची जबाबदारी घ्यावी," असे सरसंघचालकांनी नमूद केले.
सणांमधील संवेदनशीलता
सणांच्या काळातील धार्मिक भावनांबद्दल बोलताना भागवत म्हणाले, "उपवासाच्या काळात लोक शाकाहारी राहणे पसंत करतात. त्या दिवसांमध्ये जर काही विशिष्ट दृश्ये सादर केली गेली, तर भावना दुखावल्या जाऊ शकतात. हा फक्त दोन-तीन दिवसांचा प्रश्न आहे. त्या काळात अशा गोष्टी टाळणे शहाणपणाचे आहे. मग कोणत्याही कायद्याची गरज भासणार नाही."
लोकसंख्या धोरणावर भाष्य
लोकसंख्येच्या मुद्द्यावर बोलताना, भागवत म्हणाले की, भारतातील प्रत्येक नागरिकाला आदर्शपणे तीन मुले असावीत. "लोकसंख्या नियंत्रित आणि पुरेशी राहिली पाहिजे. या दृष्टिकोनातून, तीन मुले असावीत - त्यापेक्षा जास्त नको. प्रत्येकाने हे स्वीकारले पाहिजे," असे ते म्हणाले. "आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण सरासरी २.१ मुलांची शिफारस करते. पण गणितात २.१ म्हणजे २ असले तरी, दोन मुलांनंतर तिसऱ्या मुलाचा जन्म झाल्यावर ती संख्या ३ होते, म्हणूनच २.१ म्हणजे ३. प्रत्येक नागरिकाने पाहावे की त्याच्या कुटुंबात तीन मुले असावीत."
आरक्षणाला संघाचा कायम पाठिंबा
मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की, संघ आरक्षणाला पाठिंबा देत आला आहे आणि जोपर्यंत त्याच्या लाभार्थ्यांना त्याची गरज नाही असे वाटत नाही, तोपर्यंत देत राहील. बाळासाहेब देवरस सरसंघचालक असताना संघाने आरक्षणाच्या बाजूने ठराव मंजूर केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.
काशी-मथुरा आणि शहरांची नावे
एका प्रश्नाला उत्तर देताना भागवत म्हणाले, "राम मंदिर हे एकमेव आंदोलन होते ज्याला संघाने पाठिंबा दिला. काशी-मथुरा मुक्ती आंदोलनाला संघ पाठिंबा देणार नाही, पण स्वयंसेवक त्यात भाग घेऊ शकतात." "शहरे आणि रस्त्यांना आक्रमकांची नावे देऊ नयेत. मी असे म्हटले नाही की मुस्लिमांची नावे नसावीत. ती वीर अब्दुल हमीद आणि अब्दुल कलाम यांच्या नावाने असावीत. आक्रमकांची नावे नसावीत," असेही त्यांनी स्पष्ट केले.
संघ आणि भाजपचे नाते
संघच भाजपच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेतो, हे दावे भागवत यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, "संघ सर्व काही ठरवतो असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही सल्ला देऊ शकतो, पण निर्णय त्याच क्षेत्रात घेतले जातात. आमचे मतभेद असू शकतात, पण मनभेद नाहीत."
यावेळी त्यांनी जयप्रकाश नारायण आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही आठवण काढली. ते म्हणाले की, "सुरुवातीला जयप्रकाश नारायण संघाच्या विरोधात होते, पण नंतर ते आमच्या जवळ आले. प्रणव मुखर्जीही संघाच्या मंचावर आले होते. कोणाचेही मन बदलू शकते."