झारखंडमधील सारंडा जंगलात गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या दोन मोठ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांना अभूतपूर्व यश मिळाले आहे. या कारवाईत नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य 'अनिल दा' याच्यासह तब्बल १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. या मोठ्या यशानंतर, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या ३१ मार्चच्या डेडलाईनपूर्वी झारखंडमधून नक्षलवादाचा पूर्णपणे नायनाट केला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
झारखंडचे आयजी (ऑपरेशन्स) मायकल राज यांनी सांगितले की, "माओवाद्यांचे मनोधैर्य आणि कणा आता पूर्णपणे मोडला आहे. आम्हाला त्यांच्या हालचालींची सातत्याने माहिती मिळत असून त्यानुसार कठोर कारवाई केली जात आहे. आता या नक्षलवाद्यांकडे शरणागतीशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही." माओवाद्यांच्या कुटुंबांनाही आपल्या पाल्यांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी विनंती केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
सीआरपीएफचे आयजी साकेत सिंह यांनी नक्षलवादी चळवळीकडे वळलेल्या तरुणांना आवाहन केले आहे की, "ज्या तरुणांनी चुकून नक्षलवादाचा मार्ग स्वीकारला आहे, त्यांनी जवळच्या पोलीस कॅम्पमध्ये किंवा अधिकाऱ्यांकडे येऊन आत्मसमर्पण करावे. त्यांचे स्वागत केले जाईल आणि पुनर्वसन केले जाईल. मात्र, त्यांनी माओवाद्यांची साथ सोडली नाही, तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल."
पोलिसांच्या दाव्यानुसार, आता संपूर्ण राज्यात नक्षलवाद्यांची संख्या केवळ ६० च्या आसपास उरली आहे. यातील ४० ते ५० नक्षलवादी पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सक्रिय आहेत. चतरा आणि लातेहारमध्ये प्रत्येकी ४, तर हजारीबागमध्ये २ नक्षलवादी सक्रिय आहेत. पश्चिम सिंगभूममधील १४ नक्षलबाधित पोलीस ठाण्यांपैकी आता केवळ दोनच (जराईकेला आणि छोटानागरा) पोलीस ठाणी प्रभावीत उरली आहेत. माओवाद्यांच्या शीर्ष नेतृत्वापैकी आता फक्त मिसिर बेसरा आणि असीम मंडल हे दोनच नेते सक्रिय असून अनिल दा, विवेक आणि सहदेव सोरेन यांसारखे मोठे नेते मारले गेले आहेत.