'टूरिस्ट ट्रेड इंटरेस्ट गिल्ड' (TTIG) यांच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील क्षण
काश्मीरमधील पर्यटन क्षेत्रातील नव्या संधी, धोरणे आणि उज्वल भवितव्यावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील शिवाजीनगर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'टूरिस्ट ट्रेड इंटरेस्ट गिल्ड' (TTIG) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा विषय 'पर्यटनविषयक दृष्टीकोन व भविष्यातील काश्मीर' असा होता. पुण्यातील पर्यटन व्यवसायाने या उपक्रमाला मोठा पाठिंबा दिला. ७० हून अधिक नामवंत टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी काश्मीरमधून मान्यवरांची मोठी मांदियाळी पुण्यात दाखल झाली होती. यामध्ये 'टूरिस्ट ट्रेड इंटरेस्ट गिल्ड'चे चेअरमन ज़हूर अहमद करनाई, व्हाइस चेअरमन बशीर अहमद करनाई, ज्येष्ठ संस्थापक सदस्य मोहम्मद अकरम सियाह, एम.सी. सदस्य मोहम्मद शफी वांगणू, मुमिन वानी आणि मंज़ूर पख्तून यांचा समावेश होता. या मान्यवरांनी काश्मीरमधील बदलत्या पर्यटनाचे सादरीकरण केले. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी केलेली चोख व्यवस्था, आधुनिक सोयी-सुविधा, नवीन टुरिझम सर्किट्स, साहसी खेळ आणि हनीमून डेस्टिनेशन्स अशा विविध पैलूंवर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या माध्यमातून काश्मीरला एक नवे रूप प्राप्त करून देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते ज़हूर अहमद करनाई यांनी काश्मीरच्या सौंदर्याचे वर्णन करताना भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, “काश्मीर हे आपलेच आहे आणि ते भारताचा मुकुट आहे. निसर्गसौंदर्याचे अद्भुत वरदान लाभलेल्या या भूमीतील नद्या, बर्फाच्छादित डोंगर, ऐतिहासिक वारसा आणि इथली समृद्ध संस्कृती यांचा अनुभव प्रत्येक भारतीयाने एकदा तरी घ्यायलाच हवा.” काश्मीरमधील आदरातिथ्य आणि तिथले स्वादिष्ट खाद्यपदार्थ पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातून काश्मीरला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना करनाई यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “पुणे आणि महाराष्ट्रातून दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरमध्ये येतात. यंदाच्या वर्षी अधिकाधिक पुणेकरांनी काश्मीरला भेट द्यावी, यासाठी आम्ही विशेष नियोजन केले आहे. सर्व पर्यटकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यास आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.” या थेट संवादामुळे पुण्याचे पर्यटन व्यावसायिक आणि काश्मीरमधील प्रतिनिधींमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. भविष्यात काश्मीरच्या पर्यटनाला नवी गती देण्यासाठी हे व्यासपीठ अत्यंत मोलाचे ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.