अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन हेरिटेज लँग्वेजेस अँड कल्चरल स्टडीज’प्रकल्पाची पायाभरणी
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये उभारण्यात येत असलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन हेरिटेज लँग्वेजेस अँड कल्चरल स्टडीज’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी बोलताना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, मुंबई विद्यापीठासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या उच्च शिक्षण संस्थेत या केंद्राची स्थापना होणे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. या केंद्राच्या माध्यमातून पाली, प्राकृत आणि अवेस्ता-पह्लवी यांसारख्या प्राचीन आणि समृद्ध वारसा भाषांचा अभ्यास, संशोधन, जतन आणि संवर्धन केले जाईल. हा उपक्रम केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही, तर भारताच्या उज्ज्वल भविष्याचा एक मजबूत पाया घालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे केंद्र ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भाषांच्या संशोधनात नवीन दालने उघडेल आणि भारताची सांस्कृतिक व शैक्षणिक जडणघडण अधिक मजबूत करेल, असेही रिजिजू यांनी नमूद केले.
अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार यांनी मुंबई विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या केंद्रामध्ये संशोधनासाठी प्रचंड क्षमता आहे, विशेषतः विद्यापीठाच्या कार्बन डेटिंग सुविधेमुळे हे शक्य होईल, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. तसेच, देशातील इतर भाषा संशोधन केंद्रांनी विद्यार्थी शिक्षण देवाणघेवाण कार्यक्रमांद्वारे एकमेकांशी सहयोग साधावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हे केंद्र पाली, प्राकृत आणि अवेस्ता-पह्लवी या भाषांवर लक्ष केंद्रित करून भारताच्या भाषिक वारशाचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हाती घेईल. प्राचीन हस्तलिखितांचे दस्तावेजीकरण, डिजिटायझेशन, भाषा अभ्यासात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंगचा (ML) वापर, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २२ घटनामान्य भाषांमध्ये शैक्षणिक सामग्री तयार करणे यांसारखे उपक्रम हे केंद्र राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत (PMJVK) या केंद्राच्या स्थापनेसाठी ४९.९५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पायाभरणी समारंभाला अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार, सहसचिव श्री. राम सिंह, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद करांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले.