 
                                
जेमिमा रॉड्रिग्जच्या (Jemimah Rodrigues) अविश्वसनीय शतकाच्या जोरावर, भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत, भारताने ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून पराभूत केले आणि फायनलमध्ये धडक मारली.
या विजयासह, भारताने २००५ आणि २०१७ नंतर, तिसऱ्यांदा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या रोमहर्षक सामन्यात, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ३३९ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली. किम गार्थने पॉवरप्लेमध्येच शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांचे बळी घेत भारताला बॅकफूटवर ढकलले होते.
पण त्यानंतर, २५ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्जने कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) (८९) सोबत तिसऱ्या गड्यासाठी १६७ धावांची विक्रमी भागीदारी रचून भारताला सामन्यात परत आणले. जेमिमाने १३४ चेंडूंत १२७ धावांची शानदार खेळी केली; हे तिचे विश्वचषकातील पहिलेच शतक ठरले. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर, जेमिमाने एक बाजू लावून धरत आपले शतक पूर्ण केले.
रिचा घोष (२६) आणि दीप्ती शर्मा (२४) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी करत विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकांमध्ये अमनजोत कौरने (१५*) चौकार मारून भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. जेमिमा रॉड्रिड्जला तिच्या या अविश्वसनीय खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' (POTM) पुरस्काराने गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी फिबी लिचफिल्ड (Phoebe Litchfield) हिने ११९ धावांची शानदार शतकी खेळी केली. क्रांती गौडने कर्णधार अलिसा हिलीला लवकर बाद केले, पण त्यानंतर लिचफिल्ड आणि एलिस पेरी (Ellyse Perry) (७७) यांनी डाव सावरला. लिचफिल्डने आपले पहिले विश्वचषक शतक अवघ्या ८० चेंडूंत पूर्ण केले.
अमनजोत कौरने लिचफिल्डला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर श्री चरणी (Sree Charani) (२/४९) हिने सलग बळी घेत मूनी (जेमिमाकरवी झेलबाद) आणि सदरलँडला बाद केले. जेमिमाने क्षेत्ररक्षणातही कमाल दाखवत एका धावबादमध्ये (Run-out) महत्त्वाची भूमिका बजावली. अखेरच्या षटकांमध्ये ॲश गार्डनरने (Ash Gardner) ५४ चेंडूंत ६३ धावांची धडाकेबाज खेळी करत ऑस्ट्रेलियाला ३३९ धावांपर्यंत पोहोचवले.
रविवारी, नवी मुंबईत होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
