न्यायालयासमोर नेतागिरी फिकी

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
आदेश येताच दिग्गजांना पदे सोडावी लागली
आदेश येताच दिग्गजांना पदे सोडावी लागली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी मोदी आडनावावरून वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राहुल यांची खासदारकी गेली असून याआधीही अशाचप्रकारे काही नेत्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर सदस्यत्व गमवावे लागले होते.

- लालूप्रसाद यादव : पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने सप्टेंबर २०१३ मध्ये दोषी ठरविल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यावेळी ते बिहारच्या सारन जिल्ह्याचे खासदार होते.

- जे. जयललिलता : बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांना २०१४ मध्ये चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांना तमिळनाडू विधानसभेने अपात्र घोषित केले होते, त्यावेळी जयललिता या मुख्यमंत्री होत्या, त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

- आझम खान : समाजवादी पक्षाचे बाहुबली नेते ते रामपूरचे आमदार होते. विधानसभा निवडणुकीत ते दहावेळा निवडून आले होते. आझम खान खासदारही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून त्यांना न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यात त्यांना जामीन मिळाला असला तरी आमदारकी रद्द झाली आहे.

- अब्दुल्ला आझम : आझम खान यांचा अब्दुल्ला आझम हा पुत्र आहे. मुरादाबाद (उत्तर प्रदेश)मधील एका विशेष न्यायालयाने १५ वर्षे जुन्या प्रकरणात या पिता-पुत्राला दोन वर्षांची शिक्षा दिली ठोठावली होती. अब्दुल्लाला रामपूरमधील स्वार विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सोडावे लागले आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे.

- विक्रम सैनी : मुझफ्फरनगरमधील खतौलीचे भाजप आमदार असलेल्या विक्रम सैनीला २०१३मधील धार्मिक दंगलीप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुनावली. यामुळे त्याची आमदारकी गेली आहे. पक्षाने या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी सैनीची पत्नी राजकुमारी सैनीला तिकीट दिले होते. पण तिचा पराभव झाला.

- कुलदीपसिंह सेंगर : उन्नाव बलात्काराच्या गुन्‍ह्यात दोषी ठरलेला भाजपचा कुलदीपसिंह सेंगर याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा दिल्यानंतर त्याला आमदारकी सोडावी लागली आहे.
 
- ममतादेवी : झारखंडमधील रामगड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार ममतादेवी हिला हजारीबाग जिल्‍ह्यातील एका विशेष न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. रामगड जिल्ह्यातील गोला येथे २०१६मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात तिला दोषी ठरविण्यात आले होते.

- खब्बू तिवारी : अयोध्येतील गोसाईगंज मतदारसंघाचे भाजपचे आमदार इंद्रप्रतापसिंह ऊर्फ खब्बू तिवारी याचे सदस्यत्व २०२१मध्ये रद्द झाले होते. बनावट गुणपत्रिका प्रकरणात तो दोषी आढळला होता. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी एमपी-एमएलए न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने तिवारीला जामीन मंजूर केला आहे.

- मोहमंद फैजल : माजी केंद्रीय मंत्री पी.एम सईद आणि मोहंमद
सालिया यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप लक्षद्विपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यावर होता. न्यायालयाने त्यांना दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर त्याचे सदस्यत्व गेले. केरळ उच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

- अशोकसिंह चंदेल : उत्तर प्रदेशमधील हमीरपूरमधील भाजप आमदार अशोकसिंह चंदेल याला खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यावर त्याचे पद गेले.

- अनिलकुमार साहनी : राष्ट्रीय जनता दलाचा आमदार अनिलकुमार साहनीला दिल्लीतील ‘सीबीआय’ न्यायालयाने फसवणुकीच्या एका प्रकरणात दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामुळे बिहार विधानसभेत त्याला अपात्र जाहीर करण्यात आले.

- अनंतकुमारसिंह : बिहारमधील मोकामा मतदारसंघातील राष्ट्रीय जनता दलाचा आमदार अनंतकुमारसिंह याच्या घरातून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात पाटणा न्यायालयाने त्याला दोषी ठरविल्यानंतर त्याचे सदस्यत्व रद्द झाले होते.