भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाने (EOC) माहिती दिली की, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शहरी भागात पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, आपत्कालीन नियंत्रण कक्षाने सर्व जिल्हा प्रशासनांना महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. "घाट परिसरात लहान-मोठे भूस्खलन होण्याची आणि अचानक पूर येण्याची शक्यता आहे. नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती कारवाई करावी," असे नियंत्रण कक्षाने म्हटले आहे.
जिल्हा प्रशासनाने आपले नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. सखल शहरी भागांमध्ये पाण्याचे पंप तैनात करावेत आणि जुन्या व धोकादायक इमारतींवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही सांगण्यात आले.
"कोकणातील आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या साठवणुकीचा आणि विसर्गाचा नियमित आढावा घ्यावा. संभाव्य अतिवृष्टी लक्षात घेता, नागरिकांपर्यंत एसएमएस, सोशल मीडिया आणि स्थानिक माध्यमांद्वारे आपत्तीचा पूर्व-इशारा पोहोचवावा," अशा सूचना नियंत्रण कक्षाने दिल्या आहेत.
नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, पूरप्रवण भागांपासून दूर राहावे आणि विजा चमकत असताना झाडांखाली उभे राहू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. "पुरापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घ्या. पूरस्थितीत सुरक्षिततेसाठी स्थानिक निवारा केंद्रांचा वापर करा. अनावश्यक प्रवास टाळा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका," असेही सांगण्यात आले.
संभाव्य पूरस्थितीसाठी जिल्ह्यांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक:
धाराशिव - ०२४७२-२२७३०१; बीड - ०२४४२-२९९२९९; परभणी - ०२४५२-२२६४००; लातूर - ०२३८२-२२०२०४; रत्नागिरी - ७०५७२२२२३३; सिंधुदुर्ग - ०२३६२-२२८८४७; पुणे - ९३७०९६००६१; सोलापूर - ०२१७-२७३१०१२; अहिल्यानगर - ०२४१-२३२३८४४; नांदेड - ०२४६२-२३५०७७; रायगड - ८२७५१५२३६३; पालघर - ०२५२५-२९७४७४; ठाणे - ९३७२३३८८२७; सातारा - ०२१६२-२३२३४९ आणि मुंबई शहर व उपनगरे - १९१६ / ०२२-६९४०३३४४.