भारतीय हवाई दलाचे सर्वांत जुने लढाऊ 'मिग-२१' हे विमान ६२ वर्षांच्या सेवेनंतर पुढील महिन्यात निवृत्त होणार आहे. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी राजस्थानमधील हवाई तळावरून लढाऊ विमानातून शेवटचे उड्डाण केले. 'मिग-२१' ला २६ सप्टेंबर २०२५ रोजी चंडीगड येथे एका औपचारिक समारंभात अधिकृत निरोप दिला जाईल. 'मिग-२१'च्या प्रवासाबद्दल...
निर्मिती कोणाची?
मिग-२१' हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे रशियन बयावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाला बालालेका या टोपण नावानेही ओळखतात. हे विमान याच नावाच्या एका रशियन वाद्यासारखे दिसते, असेही म्हटले जाते. सोव्हिएत युनियनमध्ये मिकोपान गुरेविच व्युरोने ही विमाने तयार केली होती. त्या नावावरूनाच या विमानांना 'मिग-२१' असे नाव पडले. जवळपास ६० देशांनी या विमानांना आपल्या हवाई दलात समाविष्ट करून घेतले होते. काही वर्षांपूर्वी सर्वाधिक 'मिग-२१' विमाने भारताच्या ताफ्यात होती.
अशी आहे रचना
-
विमानाच्या इंजिनात हवा विमानाच्या पुढील भागातून आत ओढली जाते. त्यामुळे यात रडार ठेवण्याची जागा उरत नाही. विमानात इंधनाच्या टाकीतून एका प्रमाणाबाहेर इंधन वापरले गेले, तर विमानाचा गुरुत्वमध्य मागच्या बाजूला धस्सरतो.
-
या विमानाचे सोपे असलेले नियंत्रण, शाक्तिशाली इंजिन यामुळे हे विमान उड्डाणासाठी तुलनेने सोपे ठरते; तसेच विमानाच्या मुख्य पंखामागे असलेल्या छोटया पंखांमुळे विमानाला स्थिरता लाभते. यामुळे नवख्या किंवा किमान प्रशिक्षण असलेल्या वैमानिकालाही हे विमान सहजतेने हाताळता येते.
-
या विमानात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उणीव असतानाही या विमानाला पसंती दिली गेली. कारण त्याचे निर्मितिमूल्य तुलनेने कमी होते. पुढे जाऊन अनेक रशियन, इस्राईलच्या कंपन्यांनी विमानात अन्य आधुनिक उपकरणे विकसित केली.
महत्त्वाच्या युद्धात सहभाग
-
१९६२ मध्ये 'मिग-२१' विमाने भारताच्या हवाई बलात सहभागी झाली होती.
-
१९६५ व १९७१ चे युद्ध, १९९९ चे कारगिल युद्ध, २०१९ चा 'बालाकोट एअर स्ट्राईक' या महत्त्वाच्या संघर्षांमध्ये या विमानांचा उपयोग करण्यात आला.
-
१९६५ च्या भारत-पाक युद्धात प्रशिक्षित वैमानिकांच्या कमतरतेमुळे ते पूर्ण क्षमतेने वापरले गेले नाही. मात्र, त्याच्या वैशिष्ट्यांची कल्पना आल्यानंतर भारतीय हवाई दल सतर्क झाले आणि या विमानाची मोठी मागणी रशियाकडे केली गेली. त्यानंतर या विमानांच्या दुरुस्तीसाठी वेगळी यंत्रणा उभारली गेली, तसेच वैमानिक प्रशिक्षणावर आणखी भर दिला गेला.
असे झाले अखेरचे उड्डाण
एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि पैवर तुकडीने काही सोमवारी (ता.२५) मिग-२१ मधून एकत्र भरारी घेतली. हे विमान चालवण्यासाठी लागणारे प्रशिक्षण देणे कठीण झाले आहे. हे विमान चालवण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. या कारणामुळेच अखेर हवाई दलाने 'मिग-२१' विमानाची सेवा बंद करण्याचे ठरवले आहे.
उडत्या शवपेट्या असा ठपका
अनेक मोहिमांमध्ये भारतीय हवाई दलासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'मिग-२१' लढाऊ विमानांवर गेल्या काही वर्षात झालेल्या अपघातांमुळे अकार्यक्षमतेबाबतचा ठपका ठेवण्यात आला. विमानांचे ४०० अपघात झाले असून, त्यात काही वैमानिकांचे मृत्यूदेखील ओढवले आहेत. त्यामुळेच या विमानांवर 'उडत्या शवपेट्या' असा ठपका ठेवला गेला.
एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, "जगभरात ६० हुन अधिक देशांनी ११,००० पेक्षा जास्त मिग-२१ विमा वापरली. 'तेजस' विमान हे 'मिग-२१'ची जागा घेईल, पण त्याला आणखी विकसित करावे लागेल. 'तेजस'साठी नवीन शस्त्रास्त्रांचाही विचार करावा लागेल."