'मिझोराम शांतता करार' बंडखोरी संपवण्यासाठी ठरेल दिशादर्शक

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 Months ago
मिझोरामचा बंडखोरीपासून ते शांततेपर्यंतचा प्रवास
मिझोरामचा बंडखोरीपासून ते शांततेपर्यंतचा प्रवास

 

पल्लव भट्टाचार्य :

३० एप्रिल २०२६ रोजी मिझोराममधील शेवटच्या बंडखोर गटाने शस्त्रे खाली ठेवली आणि राज्याने एक मोठा शांततापूर्ण विजय मिळवला. मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मिझोरामला 'बंडखोरीमुक्त' घोषित केले. एकेकाळी भारतापासून वेगळे होण्याच्या धमक्या देणाऱ्या आणि अशांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्याला या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

फुटीरतावादाचा अड्डा असलेला हा भाग आज बंडखोरांच्या पुनर्वसनाचा भारतातील सर्वात यशस्वी आदर्श बनला आहे. हे केवळ प्रशासकीय यश नसून एक मोठा सामाजिक बदल आहे. आसाम आणि देशभरातील नक्षलग्रस्त राज्यांना यातून खूप काही शिकता येईल.

शांततेचा पाया आणि सन्मान

मिझोरामचा बंडखोरीपासून ते शांततेपर्यंतचा प्रवास केवळ १९८६ च्या ऐतिहासिक करारावर थांबला नाही. शांतता कशी रुजवली आणि टिकवली गेली, यावर हे यश अवलंबून होते. बंडखोरांनी केवळ शस्त्रे टाकणे पुरेसे नसते, तर त्यांना समाजात योग्य स्थान मिळायला हवे, याची खोलवर जाण राज्याला होती. म्हणूनच मिझोराममधील पुनर्वसन हा केवळ शस्त्रे टाकण्यापुरता मर्यादित व्यवहार राहिला नाही.

सरकार आणि समाजाने मिळून त्यांना मुख्य प्रवाहात आणले. माजी बंडखोरांना सुरक्षा दलांमध्ये सामावून घेत रोजगाराच्या संधी दिल्या गेल्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समाजाने त्यांना कसलाही कलंक न लावता पुन्हा आपलंसं केलं. याच वागणुकीमुळे हिंसेचे चक्र तिथे कायमचे थांबले.

मिझो समाज आणि चर्चचे योगदान

या संपूर्ण प्रक्रियेत मिझो समाजाची भूमिका अत्यंत मोलाची ठरली. यंग मिझो असोसिएशन आणि चर्च यांसारख्या संस्थांनी शांततेचे मूक शिल्पकार म्हणून काम केले. जे काम केवळ सरकार करू शकत नाही, ते त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवले. लोकांचा दृष्टिकोन बदलणे, पूर्वग्रह दूर करणे आणि सामूहिक जबाबदारीची भावना रुजवणे यांसारखी मोठी कामे या संस्थांनी केली.

मिझोराममधील शिस्तबद्ध वाहतूक पाहून अनेकदा पर्यटक थक्क होतात. ही शिस्त केवळ कायद्याच्या भीतीतून आलेली नसून ती नागरिकांच्या स्वभावात भिनलेली आहे. नियम स्वतःचे मानणाऱ्या समाजातच त्यांचा खरा आदर राखला जातो, हे यातून दिसते. उच्च साक्षरता, समाजातील घट्ट वीण आणि भूतकाळातील संघर्षातून मिळालेल्या ताकदीचाच हा एक भाग आहे.

आसाम आणि नक्षलग्रस्त भागांसाठी धडा

मिझोरामचे हे पीस मॉडेल इतर राज्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे ठरते. राजकीय तोडगा, आर्थिक पाठबळ आणि सामाजिक स्वीकार यांचा इथे सुंदर मेळ घातला गेला आहे. आसामने नुकताच उल्फा (ULFA) या संघटनेसोबत असाच एक शांतता करार करत राज्याला बंडखोरीमुक्त जाहीर केले. या करारात सौर ऊर्जेवर आणि विकासावर विशेष भर दिला आहे. ३,००० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्याचे हे पाऊल नक्कीच दूरदृष्टीचे आहे.

मात्र, अशा योजना केवळ कागदोपत्री विकासाची उद्दिष्टे राहू नयेत, हाच मोठा धडा मिझोराममधून मिळतो. या योजनांचा थेट संबंध शरण आलेल्या बंडखोरांच्या आयुष्याशी जोडला गेला पाहिजे. उल्फाच्या माजी बंडखोरांना या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणी आणि देखभालीच्या कामात सामावून घेतल्यास त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होईल. त्यांना केवळ आर्थिक मदत देण्याऐवजी राज्याच्या उभारणीत सहभागी करून घेतल्यास ते बदलाचे खरे शिल्पकार बनतील.

सर्वसमावेशक विकासाची गरज

नक्षलग्रस्त भागांसाठीही हाच नियम तितक्याच तातडीने लागू होतो. अशा ठिकाणी जमिनीवरून विस्थापित होणे आणि विकासापासून वंचित राहणे हीच बंडखोरीची मुख्य कारणे असतात. विकासाची प्रक्रिया सर्वसमावेशक असावी, हे मिझोरामच्या अनुभवातून शिकायला मिळते. स्थानिक लोकांचा सहभाग आणि त्यांच्या अधिकारांचा आदर या प्रक्रियेत अत्यंत आवश्यक असतो. मोठ्या प्रकल्पांसाठी लोकांना त्यांच्या जमिनीवरून हटवण्याऐवजी, त्यांनाच या प्रक्रियेचा मुख्य भाग बनवायला हवे.

मिझोरामच्या यशाचे आणखी एक मोठे कारण म्हणजे त्यांनी बंडखोरांना दिलेला सन्मान. शेवटच्या गटाने शस्त्रे खाली ठेवली, तेव्हा त्याला 'पराभव' न म्हणता 'घरवापसी' (Homecoming) असे नाव दिले गेले. या शब्दांना खूप महत्त्व असते. यामुळे बंडखोरांना कोणताही अपमान न वाटता पुन्हा समाजात मिसळता येते.

खऱ्या शांततेचा अर्थ

मिझोरामचे हे मॉडेल जसेच्या तसे इतरत्र लागू करता येईल, असे मानणे घाईचे ठरेल. राज्याची छोटी लोकसंख्या आणि भक्कम सांस्कृतिक एकात्मता यांचा त्यांच्या यशात मोठा वाटा आहे. तरीही, चर्चेतील सन्मान, समाजाचा सहभाग आणि कायमस्वरूपी पुनर्वसन ही मुख्य तत्त्वे कुठेही लागू करता येण्यासारखी आहेत.

आज मिझोराम केवळ एक शांततापूर्ण राज्य नसून सुशासनाचा तो एक उत्तम पुरावा आहे. शांत रस्ते, शिस्तबद्ध नागरिक आणि बंडखोरीचा अभाव या गोष्टी एका रात्रीत घडलेल्या नाहीत. एका मोठ्या सामाजिक बदलाचा तो परिणाम आहे. एप्रिल महिन्यातील त्या दिवशी शस्त्रे खाली ठेवल्यानंतर आलेली शांतता म्हणजे केवळ बंदुकांच्या आवाजाचा शेवट नव्हता. सूडाऐवजी समेटाची आणि अलिप्ततेऐवजी आपलेपणाची निवड करणाऱ्या एका प्रगल्भ समाजाची ती साक्ष होती. आसाम, नक्षलग्रस्त भाग किंवा हिंसाचारातून सावरू पाहणाऱ्या कोणत्याही समाजासाठी यातून एकच स्पष्ट संदेश मिळतो. केवळ युद्ध संपले म्हणजे शांतता टिकत नाही. तर, जेव्हा लोक एकत्र येतात आणि नव्याने समाज उभारतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने शांतता नांदते. 

(लेखक आसाम पोलिसांचे माजी महासंचालक आहेत)