प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघ मेळ्यादरम्यान शुक्रवारी बसंत पंचमीच्या निमित्ताने एक अभूतपूर्व श्रद्धा पाहायला मिळाली. सकाळी आठ वाजेपर्यंतच १ कोटीहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमावर डुबकी लावली. माघ मेळ्यातील भाविकांची ही प्रचंड गर्दी आणि धार्मिक उत्साह संपूर्ण मेळा क्षेत्रात ओसंडून वाहत होता.
प्रयागराज मेळा प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आदल्या रात्रीपासूनच लोकांनी संगम परिसराकडे धाव घ्यायला सुरुवात केली होती. बसंत पंचमीच्या मुहूर्तावर सकाळी आठ वाजेपर्यंत १.०४ कोटी भाविकांनी श्रद्धेने आणि भक्तीभावाने पवित्र स्नान पूर्ण केलं. त्रिवेणी संगमावरील हे स्नान आत्मिक शांतता देणारं असल्याची भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली.
तीर्थ पुरोहित राजेंद्र मिश्रा यांनी या दिवसाचं महत्त्व सांगताना सांगितलं, "प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीचा वास असल्याने बसंत पंचमीच्या स्नानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पिवळी वस्त्रे परिधान करणे, पिवळ्या वस्तूंचे दान करणे आणि माता सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. हा सण ऋतू परिवर्तनाचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे लोक गुलाल आणि रंगांची उधळण करत हा आनंद साजरा करतात."
मंडळ आयुक्त सौम्या अग्रवाल यांनी माहिती दिली की, माघ मेळ्यासाठी एकूण ८०० हेक्टर क्षेत्राची सात सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे. संपूर्ण मेळा क्षेत्रात २५,००० हून अधिक शौचालये आणि ३,५०० हून अधिक स्वच्छता कर्मचारी तैनात आहेत, जेणेकरून भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये. तसेच, अल्प कालावधीसाठी कल्पवास करणाऱ्या भाविकांसाठी विशेष 'टेंट सिटी' उभारण्यात आली असून, तिथे ध्यान, योग आणि इतर आध्यात्मिक उपक्रमांची सोय करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक (माघ मेळा) नीरज पांडेय यांनी सांगितलं की, भाविकांची सुरक्षा, गर्दीचं व्यवस्थापन आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी १०,००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. याशिवाय, आपत्कालीन सेवा आणि दळणवळण यंत्रणेकडेही विशेष लक्ष देण्यात आलंय. बसंत पंचमीच्या निमित्ताने गंगेच्या तीरावर झालेला हा भाविकांचा महासंगम केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर माघ मेळ्याची भव्यता आणि सामाजिक-सांस्कृतिक महत्त्वही अधोरेखित करतो.