गडचिरोली सीमेवर नक्षलवाद्यांचा खात्मा! २५ लाखांचे बक्षीस असलेला प्रभाकर ठार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मुख्य नेता प्रभाकरसह ७ नक्षलवादी मारले गेले आहेत. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या एका पोलीस जवानाचाही मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या ३ दिवसांपासून या भागात नक्षलविरोधी मोहीम सुरू होती.

मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये प्रभाकर ऊर्फ लोकेटी चंदर राव याचा समावेश आहे. तो तेलंगणातील कामारेड्डी येथील रहिवासी होता. नक्षलवाद्यांच्या गडचिरोली विभाग समिती, पश्चिम उप-झोनल ब्युरो आणि कंपनी क्रमांक १० चा तो प्रमुख होता. त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

छत्तीसगडमधून आलेल्या 'कंपनी क्रमांक १०' च्या उर्वरित सदस्यांच्या आणि नक्षलवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे ३ फेब्रुवारीच्या रात्री ही मोहीम राबवण्यात आल्याचे गडचिरोली पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. नारायणपूर-गडचिरोली सीमेवरील फोडेवाडा गावाजवळ गडचिरोली पोलिसांच्या 'सी-६०' या विशेष नक्षलविरोधी दलाच्या १४ पथकांनी ही कारवाई केली.

गुरुवारी रात्री ३ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले होते, तर शुक्रवारी आणखी ४ मृतदेह शोधण्यात आले. अशा प्रकारे आतापर्यंत ४ पुरुष आणि ३ महिला अशा एकूण ७ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. घटनास्थळावरून ३ एके-४७ रायफल्स, १ एसएलआर आणि १. ३०३ रायफल जप्त करण्यात आली आहे. प्रभाकर व्यतिरिक्त इतर मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मडंरा येथील रहिवासी असलेले सी-६० जवान दीपक चिन्ना मडावी यांनी गुरुवारी संध्याकाळी झालेल्या भीषण चकमकीत २ नक्षलवाद्यांना ठार केले. मात्र, या दरम्यान त्यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. त्यांना तातडीने भामरागड येथील रुग्णालयात विमानाने हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहीद मडावी यांच्या पार्थिवावर शनिवारी त्यांच्या मूळ गावी पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

या चकमकीत किष्ट्यापल्ली येथील रहिवासी असलेले दुसरे जवान जोगा मडावी हे देखील गुरुवारी रात्री गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. त्यांना विमानाने गडचिरोलीला आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.