काश्मीर खोऱ्यात एनआयएची मोठी कारवाई; जमात-ए-इस्लामी टेरर फंडिंगप्रकरणी शोधमोहीम सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) बंदी घालण्यात आलेल्या जमात-ए-इस्लामी (JeI) संघटनेशी संबंधित टेरर फंडिंग (दहशतवादी कारवायांसाठीचा निधी) प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून काश्मीर खोऱ्यात आज मोठी शोधमोहीम राबवली. काश्मीरमधील श्रीनगर आणि शोपियान जिल्ह्यांतील तीन वेगवेगळ्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली. 

या छाप्यांदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण आणि आक्षेपार्ह वित्तीय कागदपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेले हे साहित्य जमात-ए-इस्लामी आणि जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या विविध ट्रस्ट तसेच संघटनांच्या संशयास्पद क्रियाकलापांशी संबंधित असल्याचा संशय यंत्रणेला आहे.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब भागात असलेल्या दारुल उलूम सिराजुल उलूम या शाळेत प्रत्यक्ष जाऊन तपास केला. या शैक्षणिक संस्थेला गेल्या महिन्यातच प्रशासनाकडून बेकायदेशीर संस्था म्हणून घोषित करण्यात आले होते. 

याशिवाय, शोपियान जिल्ह्यातीलच मोलू चित्रगाम येथे राहणारे जमात-ए-इस्लामीचे माजी प्रमुख शहजादा औरंगजेब यांच्या निवासस्थानी देखील एनआयएच्या पथकाने झडती घेतली. तसेच, श्रीनगरमधील लाल बाजार भागात असलेल्या मुलींच्या 'जमीयत उल बनात' या धार्मिक शाळेतही शोधमोहीम राबवण्यात आली.

धर्मादाय निधीचा वापर देशविरोधी कारवायांसाठी केल्याचा आरोप
केंद्रीय दहशतवादविरोधी संस्था बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत बेकायदेशीर संघटना घोषित करण्यात आलेल्या जमात-ए-इस्लामीच्या फुटीरतावादी आणि देशविरोधी कारवायांचा सखोल तपास करत आहे. एनआयएच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही संघटना काश्मीर खोऱ्यासह भारताच्या इतर भागांमध्ये दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यासाठी निधी गोळा करण्यात सक्रियपणे गुंतली होती. 

आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या सेवाभावी तसेच कल्याणकारी कामांसाठी देणगीच्या नावाखाली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून हा निधी गोळा केला जात होता. मात्र, गोळा झालेला हा पैसा नंतर हिज्बुल-मुजाहिद्दीन सारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांना पुरवला जात होता. काश्मिरी तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना देशविरोधी कारवायांमध्ये ओढण्याचा कटही या माध्यमातून रचला जात होता. खोऱ्यातील हे दहशतवादी नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी एनआयएचा तपास अविरत सुरू आहे.