NIA चे ५ राज्यांत १० ठिकाणी छापे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुजरात 'अल-कायदा' दहशतवादी कटाच्या प्रकरणात पाच राज्यांमधील १० ठिकाणी छापे टाकले आहेत. या कटामध्ये बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांचा समावेश असल्याचा आरोप आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

एनआयएच्या पथकांनी बुधवारी पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये विविध संशयित आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित ठिकाणांवर ही शोधमोहीम राबवली, असे एजन्सीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.

या कारवाईत अनेक डिजिटल उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ती सर्व फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आली आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

२०२३ मध्ये गुन्हा दाखल

हा गुन्हा २०२३ मध्ये दाखल करण्यात आला होता. एनआयएच्या आरोपानुसार, हा कट चार बांगलादेशी नागरिकांभोवती केंद्रित आहे. त्यांची नावे मोहम्मद सोजिबमियान, मुन्ना खालिद अन्सारी, अझरुल इस्लाम आणि अब्दुल लतीफ अशी आहेत.

या चौघांनी बनावट भारतीय ओळखपत्रांचा वापर करून बांगलादेशातून भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी केली होती.

"हे चौघे प्रतिबंधित अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. हे लोक बांगलादेशातील अल-कायदाच्या हस्तकांना निधी गोळा करून पाठवण्याच्या कामात गुंतले होते. तसेच ते मुस्लिम तरुणांना (संघटनेसाठी) सक्रियपणे प्रेरित करत असल्याचेही आढळून आले आहे," असे निवेदनात म्हटले आहे. एनआयएने या प्रकरणी १० नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबाद विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.