भुवनेश्वर
सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी एक मोठे पाऊल उचलत ओडिशा सरकारने राज्यातील तंबाखू किंवा निकोटिनचा वापर करून बनवलेल्या सर्व अन्नपदार्थांच्या निर्मिती, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर अधिकृतपणे बंदी घातली आहे. यामध्ये गुटखा, पान मसाला, फ्लेवर्ड किंवा सुगंधी तंबाखू आणि चघळल्या जाणाऱ्या सर्व निकोटिनयुक्त पदार्थांचा समावेश आहे.
हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि तंबाखूच्या सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांबद्दल वाढत्या चिंतेनंतर घेण्यात आला आहे. ओडिशा सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तंबाखू आणि निकोटिन असलेले सर्व उत्पादनं, मग ती पाकिटात असोत किंवा सुटी विकली जात असोत, त्यांच्यावर आता ओडिशात पूर्णपणे बंदी असेल. जरी हे पदार्थ वेगळ्या नावाने विकले जात असले किंवा ग्राहक त्यांना एकत्र मिसळून वापरू शकतील अशा प्रकारे विकले जात असले, तरीही त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
ओडिशा सरकारने आपल्या अधिसूचनेत स्पष्ट केलंय की, "पान मसाला, सुपारी, चुना आणि इतर सुगंधी मसाल्यांसोबत धूररहित तंबाखूचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. विशेषतः मुलं आणि तरुणांच्या आरोग्यासाठी हे अत्यंत घातक ठरत आहे." जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने चघळण्याच्या तंबाखू उत्पादनांना कर्करोग निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या श्रेणीत टाकलं आहे. यामुळे तोंड, अन्ननलिका, पोट, घसा आणि किडनीचा कॅन्सर होण्याचा दाट धोका असतो.
ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हेच्या दुसऱ्या टप्प्यातील आकडेवारीनुसार, ओडिशातील ४२ टक्के प्रौढ लोकसंख्या धूररहित तंबाखूचा वापर करते, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे. २०१६ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार, काही विक्रेते वेगवेगळी पाकिटे देऊन गुटखा बंदीच्या नियमाला बगल देत असल्याचं समोर आलं होतं. यावर आता ओडिशा सरकारने कडक भूमिका घेतली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत राज्याच्या आरोग्य सचिवांना या बंदीची कडक अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.