मणिपूरमध्ये शांतता आणि समृद्धीला आमचे सर्वोच्च प्राधान्य - गृहमंत्री

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मणिपूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी इम्फाळ येथे नागरी समाज संघटनांशी व्यापक चर्चा केली. इम्फाळमध्ये ते महिला नेत्यांच्या (मीरा पैबिस) शिष्टमंडळालाही भेटले. मणिपूरच्या समाजातील महिलांच्या भूमिकेच्या महत्त्वाचा पुनरुच्चार करत अमित शाह म्हणाले की, आपण सर्वजण एकत्रितपणे राज्यात शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

 

केंद्रीय गृहमंत्र्यांनी COCOMI, AMUCO, AMOCOC, MMW, STDCM, FOCS, फोरम फॉर रिस्टोरेशन ऑफ पीस सारख्या नागरी समाज संघटना तसेच विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधी मंडळांचीही भेट घेतली.

 

प्रतिनिधीमंडळाने शांततेप्रती त्यांची वचनबद्धता व्यक्त केली. तसेच त्यांनी मणिपूरमध्ये सामान्य स्थिती पुन्हा स्थापित करण्यासाठी मार्ग शोधण्यात आम्ही एकत्र येऊन योगदान देऊ अशी ग्वाही देखील दिली. चुराचांदपूरला जाण्यासाठी निघण्यापूर्वी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी तेथील प्रमुख व्यक्ती, बुद्धिवंत, निवृत्त लष्करी अधिकारी तसेच नागरी प्रशासनातील कर्मचारी यांच्या गटाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. 

 

 

प्रतिनिधींनी त्या भागात शांतता आणि सामान्य परिस्थिती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी परिणामकारक हस्तक्षेप करण्याची विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांना केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चुराचांदपूर येथे भेट दिली आणि तेथे त्यांनी त्या भागातील प्रमुख व्यक्ती तसेच नागरी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधीमंडळासोबत बैठक घेतली. त्यानंतर, संध्याकाळी त्यांनी इम्फाळ येथे सर्वपक्षीय बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी मणिपूरचे पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसेच भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांसह तेथील सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा देखील घेतला. ते म्हणाले की, मणिपूरमधील शांतता आणि समृद्धता यांना आपले सर्वोच्च प्राधान्य दिले आहे आणि या भागातील शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही कारवाया कठोरपणे मोडून काढाव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.   

 

केंद्रीय गृहमंत्री उद्या मणिपूरमधील मोरेह तसेच कांगपोकपी भागाला भेट देणार आहेत. त्यावेळी ते मोरेह भागातील विविध स्थानिक गटांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील आणि नंतर कांगपोकपी  येथील नागरी सामाजिक संघटनांसमवेत बैठक घेतील. यानंतर केंद्रीय गृहमंत्री इम्फाळ येथे सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत.