भारताने आक्षेपार्ह AI पोस्ट हटवण्याचे आदेश दिल्यावर इलॉन मस्कचे स्पष्टीकरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
'एक्स'चे मालक इलॉन मस्क
'एक्स'चे मालक इलॉन मस्क

 

भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला (पूर्वीचे ट्विटर) कडक शब्दांत समज दिली आहे. एक्सच्या ग्रोक या एआय चॅटबॉटद्वारे तयार केलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील पोस्ट्स त्वरित हटवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून कायद्याचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

यावर 'एक्स'चा मालक इलॉन मस्क याने आपली बाजू मांडली आहे. मस्कच्या मते, अशा प्रकारच्या पोस्टसाठी 'ग्रोक' हे एआय टूल जबाबदार नाही. याचा वापर करणारे युजर्स यासाठी पूर्णपणे जबाबदार आहेत. मस्कने युजर्सवर दोष टाकत प्लॅटफॉर्मची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. एआय टूल केवळ एक साधन असून त्याचा वापर कसा करायचा हे युजर्सवर अवलंबून असल्याचे त्याने सुचवले आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार, एआयचा वापर करून तयार केलेले हे फोटो आणि माहिती भारतीय कायद्यांचे उल्लंघन करतात. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अशा अश्लील आणि दिशाभूल करणाऱ्या सामग्रीवर बंदी आहे. ग्रोक एआयमध्ये एक अनहिंज्ड मोड आहे. या मोडमध्ये माहितीवर कोणतेही फिल्टर किंवा निर्बंध नसतात. याचाच गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत.

अनेक राजकारणी आणि प्रसिद्ध व्यक्तींचे आक्षेपार्ह फोटो (डीपफेक) तयार करून ते व्हायरल केले जात आहेत. यामुळे लोकांच्या गोपनीयतेचा आणि सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला आहे.