संयुक्त अरब अमिराती (यूएई) वर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. सामान्य नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींनी 'एक्स' (ट्विटर) या समाजमाध्यमावर एक पोस्ट करत भारताची भूमिका मांडली. भारत यूएईच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची शांततापूर्ण मार्गाने सोडवणूक करण्याला भारताचा कायम पाठिंबा असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) सुरक्षित आणि विनाअडथळा जलवाहतूक सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.