पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (२८ जुलै) लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल आणि भारताच्या जागतिक पोहोचबद्दल भाषण दिल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या भाषणांचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान मोदींनी 'एक्स'वर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले, "रक्षामंत्री राजनाथ सिंहजी यांचे उत्कृष्ट भाषण! त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'मधील भारताच्या सुरक्षा यंत्रणेच्या यशावर आणि आपल्या सशस्त्र दलांच्या धैर्यावर सखोल दृष्टिकोन दिला."
जयशंकर यांच्या भाषणाचे कौतुक करताना ते म्हणाले, "परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकरजी यांचे भाषण उत्कृष्ट होते. 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून दहशतवादाच्या धोक्याशी लढण्याबद्दल भारताचा दृष्टिकोन जगाने किती स्पष्टपणे ऐकला आहे, हे त्यांनी अधोरेखित केले."
'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेची सुरुवात करताना संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, दहशतवाद मुळासकट उपटून काढण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यासाठी सुरू केलेले 'ऑपरेशन सिंदूर' सध्या थांबले आहे, कारण सशस्त्र दलांनी अपेक्षित उद्दिष्टे साध्य केली आहेत. परंतु, इस्लामाबादने कोणतीही कुरापत केली, तर ते पुन्हा सुरू होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, जयशंकर यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या राजनैतिक प्रयत्नांचा परिणाम असा होता की, संयुक्त राष्ट्राचे भाग असलेल्या १९० देशांपैकी केवळ तीन देशांनी 'ऑपरेशन सिंदूर'ला विरोध केला. ज्या देशावर हल्ला झाला आहे, त्याला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे, याला प्रचंड पाठिंबा मिळाल्याचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले.