संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२९ जुलै २०२५) लोकसभेत ठामपणे सांगितले की, कोणत्याही देशाच्या नेत्याने भारताला 'ऑपरेशन सिंदूर' थांबवण्यास सांगितले नाही. मात्र, देशाला संपूर्ण जगातून पाठिंबा मिळत असतानाही काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशाच्या सैनिकांच्या शौर्याला पाठिंबा दिला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पहलगाम हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'वरील दोन दिवसीय चर्चेला लोकसभेत उत्तर देताना ते म्हणाले की, दहशतवादाविरुद्धच्या संरक्षणासाठी भारताला कारवाई करण्यापासून जगातील कोणत्याही देशाने रोखले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये 'शस्त्रसंधी' घडवून आणल्याची घोषणा का केली, या विरोधी पक्षांच्या वारंवारच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले.
पंतप्रधान मोदींनी सभागृहाला सांगितले की, "९ मे च्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्रपती (जे.डी. व्हान्स) यांनी माझ्याशी तीन-चार वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मी सशस्त्र दलांसोबतच्या बैठकीत व्यस्त होतो."
"जेव्हा मी त्यांना परत फोन केला, तेव्हा अमेरिकी उपराष्ट्रपतींनी मला पाकिस्तानकडून मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला. मी त्यांना सांगितले की, जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर आमचा हल्ला खूप मोठा असेल, कारण आम्ही गोळ्यांना तोफांनी उत्तर देऊ," असे ते म्हणाले. कोणत्याही देशाच्या नेत्याने भारताला कारवाई थांबवण्यास सांगितले नाही, असे मोदींनी ठामपणे सांगितले.
पंतप्रधान म्हणाले की, भारताने हल्ला केलेले पाकिस्तानी हवाई तळ "अजूनही आयसीयूमध्ये" आहेत आणि २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार आजही रात्री जागून काढत आहेत.
"भारताला दहशतवादाविरुद्धच्या संरक्षणासाठी कोणतीही कारवाई करण्यापासून जगातील कोणत्याही देशाने रोखले नाही. संयुक्त राष्ट्रांत केवळ तीन देशांनी पाकिस्तानच्या बाजूने मत मांडले," असे त्यांनी नमूद केले.
"भारताला संपूर्ण जगातून पाठिंबा मिळाला, पण दुर्दैवाने काँग्रेसने आपल्या सैनिकांच्या शौर्याला पाठिंबा दिला नाही. काँग्रेस नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी मला लक्ष्य केले, पण त्यांची क्षुल्लक विधाने आपल्या शूर सैनिकांचे मनोधैर्य खचवणारी ठरली," असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी नमूद केले की, भारताने पाकिस्तानची अणुबॉम्बची धमकी उघड केली आणि जगाला दाखवून दिले की, "आम्ही अणुबॉम्बच्या धमक्यांना घाबरणार नाही."
"आपले 'ऑपरेशन्स' 'सिंदूर' ते 'सिंधू' (सिंधू जल करार) पर्यंत आहेत... पाकिस्तानला माहीत आहे की, कोणत्याही कुरापतीची त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. पूर्वी दहशतवादी हल्ले व्हायचे आणि सूत्रधारांना माहीत होते की काही होणार नाही, पण आता त्यांना माहीत आहे की भारत त्यांच्यासाठी येईल." पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने तयार केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानी शस्त्रे आणि दारुगोळ्याची क्षमता उघड केली.
"ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने आत्मनिर्भर भारताची ताकद पाहिली. २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आम्ही पाकिस्तानच्या आतपर्यंत घुसून २२ मिनिटांत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले," असे ते म्हणाले. पाकिस्तानला भारतीय कारवाईची थोडी कल्पना होती आणि त्यांनी अणुबॉम्बच्या धमक्या देण्यास सुरुवात केली होती, पण दहशतवादी तळांना लक्ष्य केले तेव्हा ते काहीही करू शकले नाहीत, असे मोदींनी नमूद केले.
विरोधी पक्षावर टीका करत पंतप्रधान म्हणाले, "काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष दुर्दैवाने पाकिस्तानी प्रचाराचे प्रवक्ते बनले आहेत. भारत आत्मनिर्भर बनत आहे, पण काँग्रेस आता मुद्द्यांसाठी पाकिस्तानवर अवलंबून आहे. काँग्रेस पाकिस्तानला क्लीन चिट देत आहे आणि त्यांच्यासारखीच भाषा बोलत आहे, हे पाहून संपूर्ण देशाला आश्चर्य वाटले आहे."
पहलगाम हल्ला हा 'भारतात दंगली भडकावण्याचा कट होता आणि देशाच्या एकजुटीने तो प्रयत्न हाणून पाडला', असे मोदी म्हणाले. यावेळी ते म्हणाले, " संसद अधिवेशच्या विजयोत्सवात मी बोलत आहे. दहशतवादाचे मुख्यालय नष्ट करण्याचा विजय आहे."
ते पुढे म्हणाले, "मी येथे भारतासाठी बाजू मांडण्यासाठी उभा आहे, आणि ज्यांना हे समजत नाही त्यांना आरसा दाखवण्यासाठी उभा आहे. मी सांगितले होते की, आम्ही दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना त्यांच्या कल्पनेपलीकडील धडा शिकवू."
"आपल्या सशस्त्र दलांच्या क्षमतांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. सशस्त्र दलांनी त्यांना असा धडा शिकवला की दहशतवादाचे सूत्रधार अजूनही रात्रभर झोपू शकत नाहीत," अशी पुस्तीही त्यांनी जोडली.