शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींची चीनच्या 'नंबर २' नेत्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिवालयाचे सचिव साई की
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिवालयाचे सचिव साई की

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतल्यानंतर, चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिवालयाचे सचिव साई की (Cai Qi) यांचीही भेट घेतली. भारत-चीन सहकार्य अधिक मजबूत करणे आणि द्विपक्षीय राजकीय संबंध अधिक दृढ करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.

चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) शिखर परिषदेपूर्वी झालेल्या या एकामागोमागच्या उच्चस्तरीय बैठकांमुळे, दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना वेग आल्याचे दिसत आहे.

यापूर्वी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या भेटीत, पंतप्रधान मोदी यांनी परस्पर विश्वास, आदर आणि संवेदनशीलतेच्या आधारावर भारत-चीन संबंध पुढे नेण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर भर दिला होता. सीमेवरील सैन्य माघारीनंतर शांतता आणि स्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले होते.

त्या भेटीत नरेंद्र मोदी यांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होण्यावर आणि दोन्ही देशांमधील थेट विमानसेवा सुरू होण्यावरही भाष्य केले होते. दोन्ही देशांमध्ये सीमा व्यवस्थापनावर एकमत झाले असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

आता साई की यांच्यासोबत झालेल्या बैठकीमुळे, दोन्ही देशांमधील राजकीय स्तरावरील संवाद अधिक खोलवर नेण्याचा भारताचा उद्देश असल्याचे स्पष्ट झाले आहे. साई की हे चीनी कम्युनिस्ट पक्षातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि शक्तिशाली नेते मानले जातात.