दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तानी जनतेने पुढाकार घ्यावा - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भुजमध्ये ५३, ४००  कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी आयोजित जाहीर सभेत, ‘शांतता हा पर्याय आहे, पण दहशतवाद सुरू राहिल्यास भारताकडून कठोर प्रत्युत्तर मिळेल’ असा पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर त्यांनी पाकिस्तानच्या जनतेला दहशतवाद संपवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. 

पंतप्रधान म्हणाले, “पाकिस्तानच्या जनतेला मी सांगू इच्छितो, सुख-शांतीचं आयुष्य जगा. नाहीतर माझी गोळी तयार आहे. ऑपरेशन सिंदूर ही केवळ प्रत्युत्तराची कारवाई नव्हती, तर  मानवतेच्या रक्षणासाठी आणि दहशतवाद संपवण्याची मोहीम होती.” 

पाकिस्तानच्या जनतेला आवाहन
पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांवर जबाबदारी टाकत मोदी म्हणाले, “पाकिस्तानला दहशतवादाच्या रोगापासून मुक्त करायचं असेल, तर तिथल्या जनतेने, विशेषतः तरुणांनी पुढे यावं.” त्यांनी पाकिस्तानच्या नेत्यांवर आणि लष्करावर टीका केली. “तुमचे सरकार आणि लष्कर सत्तेसाठी दहशतवादाला खतपाणी घालतात. तुमच्या मुलांचं भवितव्य कोणी उद्ध्वस्त केलं? तुमच्या तरुणांनी विचार करावा, हा मार्ग योग्य आहे का?” असा सवाल त्यांनी केला.

पुढे मोदी म्हणाले, “पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही 15 दिवस वाट पाहिली. पाकिस्तान काही कारवाई करेल, अशी आशा होती. पण दहशतवाद हाच त्यांचा धंदा आहे. मग मी आपल्या सैन्याला मोकळीक दिली. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानच्या हवाई तळांना अजूनही आयसीयूतून बाहेर पडता आलेलं नाही. आमच्या सैन्याच्या शौर्यामुळे पाकिस्तानला पांढरा झेंडा फडकवावा लागला.”

दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता
पंतप्रधानांनी भारताची शून्य सहनशीलता धोरण पुन्हा अधोरेखित केलं.  ते म्हणाले, “दहशतवादाला खतपाणी खालणाऱ्यांना तसंच प्रत्युत्तर मिळेल. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. भारत पर्यटनाला प्रोत्साहन देतो, देशांना जोडतो. पण पाकिस्तान दहशतवादालाच पर्यटन समजतो. हे जगासाठी धोकादायक आहे.” 

मोदींनी भुजच्या विकासाचं कौतुक केलं. “एकेकाळी संपूर्ण गुजरातला इतकी गुंतवणूक मिळत नव्हती. आज एकट्या कच्छमध्ये ५३, ४०० कोटींचे प्रकल्प सुरू झाले आहेत. यात नवीकरणीय ऊर्जा, बंदरं आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे. भुजची प्रगती ही भारताच्या विकासाची कहाणी आहे,” असं त्यांनी सांगितलं.