पोलीस उपनिरीक्षकामुळे वाचले १६ लोकांचे प्राण

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 1 Years ago
बेशुद्ध चालकामुळे अनियंत्रित झालेल्या व्हॅनवर मिळवले नियंत्रण
बेशुद्ध चालकामुळे अनियंत्रित झालेल्या व्हॅनवर मिळवले नियंत्रण

 

 शिताफीने आणि वेगवान हालचाली करत प्रसंगावधान राखत नियंत्रण सुटलेल्या व्हॅनचा ताबा मिळविल्याने तब्बल १६ जणांचे प्राण वाचविणारे हैदराबादचे पोलीस उपनिरीक्षक करुणाकर रेड्डी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही घटना मागच्या मंगळवारची आहे.

 तेलंगण लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीप्रकरणी अभाविपचे कार्यकर्ते दोन तीन दिवसांपासून आंदोलन करत होते. यातील १६ आंदोलकांना ताब्यात घेऊन व्हॅन सैफाबाद पोलिस ठाण्याकडे जात होती. खैरताबाद उड्डाणपूल संपल्यानंतर चालक रमेश (वय ५८) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. ते बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला. व्हॅनमध्ये आंदोलकांसह पोलीस उपनिरीक्षक एस.करुणाकर रेड्डी यांच्यासह तीन कॉन्स्टेंबल होते.

 व्हॅन हेलकावे खात असल्याचे पाहून व्हॅनच्या मागे बसलेले पोलिस अधिकारी करुणाकर रेड्डी यांनी चालकाच्या कॅबिनकडे पाहिले असता तेथे रमेश बेशद्धावस्थेत पडल्याचे पाहिले. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडीच्या मागच्या दरवाजातून उडी मारली. यावेळी त्यांच्या गुडघ्याला मारही लागला. तरीही ते धावत गेले आणि चालकाचा दरवाजा उघडला. त्यावेळी चालकाच्या तोंडातून रक्त येत होते. पण रेड्डी यांनी स्टेअरिंग फिरवले आणि दुसऱ्या हाताने ब्रेक लावला. त्यानंतर व्हॅन एका मोठा झाडाला धडकली आणि तेथेच थांबली. त्यानंतर बेशुद्ध चालकाला दवाखान्यात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. करुणाकर रेड्डी हे बंजारा हिल्स पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलिस दलात सामील होण्यापूर्वी ते वीस वर्ष नौदलात होते. त्यांच्या धाडसाचे हैदराबादेत कौतुक होत आहे