कर्नाटकात मे महिन्यात निवडणुकीची शक्यता

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
कर्नाटक विधानसभा निवडणुक
कर्नाटक विधानसभा निवडणुक

 

बंगळूर: केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यासाठी सर्व तयारी केली असून कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य विधानसभेच्या निवडणुका एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्याच्या सहमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत संकेत दिले आहेत.
 
राज्याच्या सहमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्यावतीने जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगर, निगम, महामंडळांचे आयुक्त म्हणून काम करणाऱ्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. एप्रिल, मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी जाहीर होईल. त्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करा, तसेच निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. याशिवाय आचारसंहिता तयार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचा ​​संदेश पाठवण्यात आला आहे. तत्पूर्वी, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी तीन दिवसांचा दौरा करून प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. यानंतर त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले. विशेषत: केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मतदारांना आमिष दाखविणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्याचा इशारा दिला होता.
 
राजकीय पक्ष कामाला लागले
सत्ताधारी भाजप व काँग्रेस अन्य पक्षांनी आतापासूनच प्रचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच राज्याचा दौरा करून जोरदार प्रचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. २५) पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. केआरपुरम ते व्हाइटफिल्ड मेट्रो मार्गाच्या उद्‍घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने रोड शो करणार आहेत. यानंतर मोदी चिक्कबळ्ळापूर येथे मेडिकल कॉलेज आणि दावणगेरे येथील विजय संकल्प यात्रेच्या समारोप समारंभात सहभागी होतील. या समारोप सोहळ्याला दहा लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विरोधी पक्ष काँग्रेसने सत्तेवर आतापासूनच आपला दावा ठोकला आहे आणि मतदारांना अनेक मोफत योजनांचे आश्वासन देऊन भाजपच्या सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेण्यास तयार आहे. प्रजाध्वनी यात्रा यापूर्वीच राज्यभर यशस्वीपणे पार पडली आहे. जेडीएसने प्रचार सुरु केला असून माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पंचरत्न रथयात्रा काढून मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. रविवारी पंचरत्न रथयात्रेचा समारोप होणार असून म्हैसूरमध्ये जय्यत तयारी सुरू आहे.
 
२७, २८ मार्चला अधिसूचना?
या संदर्भात निवडणूक आयोग पुढील आठवड्यात अधिसूचना जाहीर करण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या घोषणेबाबत केंद्रीय निवडणूक आयोग २७ किंवा २८ मार्चला दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन घोषणा करेल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.