आरोग्याचे कारण देत जगदीप धनकड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने या पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तयारी पूर्ण झाल्यानंतर मतदानाच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनकड यांनी अनपेक्षितपणे पदाचा राजीनामा दिला होता.
गृह मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे धनकड यांच्या राजीनाम्याची माहिती दिली असल्याचे आयोगाने प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. घटनेच्या कलम ३२४ अंतर्गत आयोगाला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम १९५२ तसेच याअंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांनुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करतात. यात स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी नेमण्याची प्रक्रिया आयोगाने सुरू केली आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित माहिती आणि रेकॉर्ड सध्या तपासले जात असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
खासदारांची गणना होणार
उपराष्ट्रपती निवडणुकीत राज्यसभेचे २४५ तर लोकसभेचे ५४३ असे ७८८ खासदार मतदान करतात. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खासदारांची गणना होईल. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराला २० खासदारांचा प्रस्तावक म्हणून तर २० खासदारांचा समर्थक म्हणून पाठिंबा असणे गरजेचे असते.
दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्पच
म मतदार यादी पडताळणीवर संसदेत चर्चा व्हावी यासाठी विरोधकांच्या आघाडीच्या खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कार्यस्थगन प्रस्तावाच्या नोटीस दिल्या होत्या. दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावरून जोरदार गदारोळही झाला. या गदारोळात लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी खासदारांनी घोषणाबाजी सुरू केल्यामुळे गोंधळ वाढल्याने काही मिनिटातच कामकाज दुपारी बारापर्यंत तहकूब करावे लागले. राज्यसभेमध्येही जोरदार गोंधळ होऊन कामकाज थांबले. मात्र नंतरही गोंधळाची पुनरावृत्ती होत राहिल्याने आजही दिवसभर लोकसभा आणि राज्यसभेचे चालू शकले नाही.