तांबड्या समुद्रातून (Red Sea) जाणाऱ्या महत्त्वाच्या undersea केबल्स तुटल्यामुळे भारत, आशिया आणि मध्य-पूर्व भागांतील इंटरनेट सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक देशांमध्ये इंटरनेटचा वेग मंदावला असून, काही ठिकाणी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामागे येमेनच्या हुथी बंडखोरांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांबड्या समुद्राच्या तळातून जाणाऱ्या 'AAE-1' आणि 'Seacom' यांसारख्या प्रमुख इंटरनेट केबल्सना नुकसान पोहोचले आहे. या केबल्स आशिया, युरोप आणि आफ्रिकेला जोडण्याचे काम करतात. या भागातून जगातील सुमारे २५% इंटरनेट ट्रॅफिक जातो, त्यामुळे या घटनेचा परिणाम कोट्यवधी युझर्सवर होत आहे.
हुथी बंडखोरांवर संशय का?
गेल्या काही महिन्यांपासून, हुथी बंडखोर तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले करत आहेत. त्यांनी यापूर्वीच समुद्राखालील केबल्सना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे, या केबल्स तुटण्यामागे त्यांचाच हात असावा, असा संशय बळकट झाला आहे. तथापि, हुथी बंडखोरांनी अद्याप याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
काय परिणाम होत आहे?
या केबल्स तुटल्याने, इंटरनेट कंपन्यांना आपला डेटा दुसऱ्या मार्गांनी वळवावा लागत आहे. यामुळे इंटरनेट नेटवर्कवर मोठा ताण येत असून, त्याचा परिणाम म्हणून इंटरनेटचा वेग कमी झाला आहे. अनेक युझर्सना वेबसाइट्स लोड होण्यास आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये अडचणी येत आहेत.
दूरसंचार कंपन्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे, परंतु या संघर्षाच्या परिस्थितीत ते पूर्ण होण्यास अनेक आठवडे लागू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे जागतिक डिजिटल कनेक्टिव्हिटी किती नाजूक आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.