राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Story by  आवाज़ मराठी | Published by  vivek panmand • 2 Years ago
मोदी आडनावावर केली होती टीका
मोदी आडनावावर केली होती टीका

 

 मोदी आडनावाचा वापर करून केलेल्या टीकेवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. फौजदारी स्वरूपाच्या २०१९ मधील मानहानीच्या प्रकरणामध्ये सुरतमधील न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आज न्यायालयाने निकाल जाहीर केला तेव्हा राहुल गांधी हे देखील कोर्टामध्ये उपस्थित होते. न्यायालयाच्या आदेशानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

 मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी एच.एच.वर्मा यांनी राहुल गांधी यांना भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत दोषी ठरवितानाच त्यांना जामीन देखील मंजूर केला. राहुल यांना या निकालाविरोधात उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करायला वेळ मिळावा म्हणून शिक्षेला ३० दिवसांपर्यंत स्थगितीही देण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते विधिज्ञ बाबू मंगकिया यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये ज्या व्यक्तीला दोन वर्षांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक काळाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येते त्या व्यक्तीचे सदस्यत्व दोषी ठरल्यापासून रद्दबातल ठरविण्यात येते. शिक्षा संपल्यानंतर देखील ती व्यक्ती सहा वर्षे अपात्रच राहते. काँग्रेसने या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशांविरोधात दाद मागण्याची तयारी चालविली आहे.

 काय होती टीका?

सगळ्याच चोरांचे नाव मोदी कसे काय असते? असा टीकात्मक सवाल राहुल यांनी केल्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातमधील माजी मंत्री पुर्नेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. राहुल यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने कर्नाटकातील कोलार येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना ही टीका केली होती. न्यायालयाच्या या निकालाचे पुर्नेश मोदी यांनी स्वागत केले आहे.

 

 राहुल गांधींना झालेल्या शिक्षेबद्दल काँग्रेस नेत्यांनी मत व्यक्त केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे की, “राहुल आणि विरोधी पक्ष भाजप सरकारचे काळे कारनामे उघड करत असून त्यामुळेच ते संतापले आहेत. विरोधकांनी आता ‘जेपीसी’द्वारे चौकशीची मागणी केली आहे. सरकारकडून ‘ईडी’, पोलिसांना कारवाईसाठी पाठविण्यात येते. राजकीय भाषणांच्या प्रकरणात खटला दाखल केला जातो. आम्ही या निकालाविरोधात उच्च न्यायालयामध्ये जाऊ.” काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, “घाबरलेली सत्ता सगळी व्यवस्था साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर करून राहुल यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. माझे बंधू न कधी घाबरले ना घाबरतील. सत्य बोलतच ते आतापर्यंत जगले आणि भविष्यात सत्यच बोलत राहतील. देशातील लोकांच्यावतीने ते आवाज उठवत राहतील. सत्याची ताकद कोट्यवधी देशवासीयांचे प्रेम त्यांच्यासोबत आहे.”

 

 राहुल यांच्या उपस्थितीचा आग्रह

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहावे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यावर न्यायालयामध्ये सुनावणी देखील झाली होती. गुजरात उच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देणारे स्वतःचेच आदेश मागे घेतल्यानंतर राहुल यांच्या अडचणी आणखी वाढल्या होत्या. राहुल यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरत न्यायालयामध्ये हजेरी लावत स्वतःचा जबाब नोंदविला होता. त्याआधी राहुल यांनी कोर्टाला आपण या प्रकरणात दोषी नाही आहोत असे सांगितले होते.