राज्यात होणार समाधानकारक पाऊस

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 13 d ago
हवामान विभागाने वर्तवला अंदाज
हवामान विभागाने वर्तवला अंदाज

 

यंदा महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार आहे. दक्षिण महाराष्ट्राचा भाग आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने सोमवारी (ता. १५) वर्तविली. नैर्ऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) जून ते सप्टेंबरदरम्यानचा पहिला दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने वर्तविला. देशात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता त्यात वर्तविली आहे. राज्यातही दमदार पावसाची हजेरी लागेल, असे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजाच्या नकाशातून स्पष्ट झाले.

मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाडा हवामान उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची मध्यम शक्यता आहे, असेही यात ठळकपणे दिसते.

यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान देशभरात समाधानकारक पावसाची शक्यता आहे. गेल्या वर्षी पुण्यासह महाराष्ट्रात जेमतेम पाऊस पडला. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासूनच पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले. शहरांमध्ये सोसायट्या सोसायट्यांमध्ये पाण्याचे टँकर

मागविले जात आहेत; तर शेतीच्या आवर्तनाची शेतकरी वाट बघत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येकाचे डोळे येणाऱ्या पावसाकडे लागले आहेत. अशा वेळी हवामान विभागाने राज्याला दिलासा देणारा अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी याबाबतची माहिती दिली.

प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या 'एल निनों'चा प्रभाव कमी होत आहे. जूनपर्यंत तो सामान्य होईल. त्यानंतर तेथे थंड पाण्याचा प्रवाह सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्याचा सकारात्मक परिणाम मॉन्सूनवर होण्याची शक्यता असल्याचेही विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाच्या सरी बरसतील.

विदर्भातही सरासरी इतका पाऊस पडेल. अर्थात हवामान विभागाने यंदाच्या पावसाळ्यातील पहिला अंदाज जाहीर केला आहे. पुढील अंदाज मेच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात येईल. त्यात एक जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाचा अंदाज असेल, असेही विभागाने सांगितले.

धन ‘आयओडी’ अनुकूल ठरणार
बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या सामान्य स्थितीत आहे. मॉन्सून हंगामात आयओडी ‘धन’ पातळीवर (पॉझिटिव्ह) राहण्याची शक्यता आहे. यातच उत्तर गोलार्धातील युरेशियामध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी हिमाच्छादन होते. संभाव्य ‘ला निना’ स्थिती, धन ‘आयओडी’ आणि युरेशियातील कमी हिमाच्छादन मॉन्सूनच्या चांगल्या पावसासाठी अनुकूल मानले जात आहे.

मॉन्सूनच्या सुरुवातीला 'एल निनो' ओसरणार
प्रशांत महासागरात सध्या मध्यम 'एल-निनो' स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीलाच 'एल निनो' स्थिती निवळण्याची शक्यता आहे. तर मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट ते सप्टेंबर 'ला निना' स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. 

मे अखेरीस चित्र स्पष्ट होणार
यंदाच्या मॉन्सून हंगामात महाराष्ट्रात दमदार पावसाचे संकित आहेत. मॉन्सून पावसाच्या वितरणाबाबत जाहीर केलेल्या नकाशानुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील पावसाबाबत या अंदाजामध्ये स्पष्टता नाही. मे अखेरीस सुधारित अंदाजात मॉन्सूनचे महाराष्ट्रातील वितरण आणखी स्पष्ट होऊ शकणार आहे.