"भारताची अर्थव्यवस्था 'डेड' नाही, तर 'लाँग लिव्ह' आहे," शिवराज सिंह चौहान यांचा ट्रम्प यांना टोला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतीय अर्थव्यवस्थेवरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "भारताची अर्थव्यवस्था 'डेड' (मृत) नाही, तर ती 'लाँग लिव्ह' (चिरंजीव) आहे," अशा शब्दांत चौहान यांनी ट्रम्प यांना टोला लगावला आणि भारताच्या मजबूत आर्थिक स्थितीचा पुनरुच्चार केला.

अमेरिकेने भारतावर कठोर व्यापारी शुल्क लादल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर टीका करणारे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना, शिवराज सिंह चौहान यांनी भारताच्या ताज्या जीडीपी (GDP) आकडेवारीचा दाखला दिला.

"चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने ७.८ टक्के विकासदर गाठला आहे, जो गेल्या पाच तिमाहींमधील सर्वोच्च आहे. हे आकडेच सर्व काही सांगत आहेत," असे शिवराज सिंह चौहान म्हणाले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत आणि लवचिक बनली आहे. बाहेरील कोणत्याही दबावाचा किंवा टीकेचा तिच्यावर परिणाम होणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, ट्रम्प यांची विधाने निराधार असून, ती त्यांच्या निराशेपोटी आलेली आहेत. "भारत आपल्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देत राहील. आम्ही कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही," असेही ते म्हणाले.

चौहान यांच्या या विधानामुळे केंद्र सरकार अमेरिकेच्या दबावासमोर नमते घेणार नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.