भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेलेला दिवस म्हणजे २६ जुलै १९९९. या दिवशी कारगील युद्ध जिंकल्यानंतर भारतीय सैन्य.
१९९९ मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. युद्धादरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावले आणि ‘ऑपरेशन विजय’चा भाग म्हणून टायगर हिल आणि इतर सर्व चौक्यांवर कब्जा करण्यात भारतीय सैनिकांनी यश मिळवले होते. ही लढाई लडाखच्या कारगिलमध्ये ६० दिवसांहून अधिक काळ भारतविरुद्ध पाकिस्तान युद्ध सुरु राहिले आणि शेवटी या लढाईत भारताने युद्ध जिंकले. दरवर्षी या दिवशी कारगील युद्धात शहीद झालेल्या शेकडो भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. आणि भारतीय सशस्त्र दलाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजित केले जाते.
पंतप्रधानांनी कारगिल युद्धातील वीरांचे केले स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. ते ट्विट करत म्हणाले कि, “कारगिल विजय दिवस, देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणादायी असणाऱ्या भारतातील अद्भुत शूरवीरांची वीर गाथा उलगडून दाखवतो. या विशेष दिवशी, मी त्यांना माझ्या हृदयापासून नमन आणि वंदन करतो. भारत चिरायु होवो!."
२६ जुलै १९९९ चा तो दिवस भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. या दिवशी भारताने जगातील सर्वात कठीण युद्धांपैकी एक म्हणजे कारगीर युद्ध जिंकले आहे.
कारगिल युद्धाचा इतिहास नेमका कसा आहे?
१९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक सशस्त्र युद्धे झाली आहेत. १९९८ मध्ये दोन्ही देशांनी अणुचाचण्या घेतल्या होत्या. लाहोर घोषणेने काश्मीर समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, ज्यावर दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये स्वाक्षरी देखील केली होती. पण पुढे नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. याच घुसघोरीला ऑपरेशन बदर असे नाव देण्यात आले होते.
लगेच भारत सरकारने या घुसघोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी 'ऑपरेशन विजय' सुरू केले आणि सुमारे दोन महिन्यांच्या मोठ्या युद्धासाठी २ लाख भारतीय सैनिकांना एकत्र जमवले. हे युद्ध मे ते जुलै १९९९ दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात सुरू झाले होते. त्यावेळचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी देशाचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न कळवता युद्धाची योजना आखली होती असे सांगितले जाते.
या युध्दात स्थानिक मेंढपाळांच्या गुप्त माहितीने मदत केली.
सुरुवातीच्या काळात पाकिस्तानने भारताच्या ताब्यातील काश्मीरमधील भाग ताब्यात घेतला. युद्धाच्या दुसऱ्या टप्प्यात, भारताने प्रथम सामाईक वाहतूक मार्ग काबीज करून प्रत्युत्तर दिले. स्थानिक मेंढपाळांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे भारतीय लष्कराला हल्ल्याचे ठिकाण ओळखता आले. अंतिम टप्प्यात भारतीय लष्कराने भारतीय हवाई दलाच्या मदतीने शत्रूवर तुटून पडले,आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात या युद्धाची सांगता झाली.
कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मात्र ही गोष्ट मान्य करण्यास पाकिस्तानने नेहमीच नकार दिला आहे. पण नंतर अशी अनेक तथ्ये युद्धादरम्यान आणि युध्दानंतरही समोर आली आहेत, ज्यात सिद्ध झाले की पाकिस्तानी लष्कराने घुसखोरांना मदत केली होती. तेव्हा नवाझ शरीफ हे मदतीसाठी अमेरिकेच्या वॉशिंग्टनलाही गेले होते. मात्र त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला मदत करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
भारतीय सैन्याने विजय कसा घोषित केला?
२६ जुलै १९९९ रोजी सैन्याने मिशन यशस्वी झाल्याचे घोषित केले. पण या विजयाची खूप जास्त किंमत भारतीय सैन्याला मोजावी लागली हे मात्र खरं आहे. या युद्धात भारतीय सैन्यातील शूर सैनिकांपैकी एक असलेले कॅप्टन विक्रम बत्रा हे या युद्धात शहीद झाले होते. नंतर बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र, भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. अलीकडेच विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित शेरशाह नावाचा चित्रपट बनवण्यात आला आहे.
ब्रॉक चिशोल्म म्हटले होते, "युद्ध कोणीही जिंकत नाही... नुकसानाचे वेगवेगळे स्तर आहेत, परंतु कोणीही जिंकत नाही." कारगिल युद्धाचे परिणाम भयंकर होते. अनेक माता आणि वडिलांनी आपले पुत्र गमावले आणि भारताने अनेक शूर सैनिक गमावले. कारगिल युद्धात भारतीय लष्कराचे ५२७ जवान शहीद झाले होते, तर पाकिस्तानचे ३५७ जवान शहीद झाले होते. या युद्धात ४५३ नागरिकांचाही मृत्यू झाला होता.
२०२२ ला कसा साजरा केला जाणार आहे कारगिल विजय दिवस?
या वर्षी कारगिल विजय दिवसाचा २३ वा वर्धापन दिन आहे. भारतीय लष्कराने दिल्लीहून कारगिल विजय दिवस मोटार बाईक मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला आहे. तसेच युद्धस्मारकावर ध्वजारोहण समारंभासाठी विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. स्मृतीस्थळावर शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येणार आहे. यानिमित्ताने द्रासमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचेही नियोजन आहे. या कार्यक्रमात शेरशाह चित्रपटाची टीम देखील उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण, तसेच देशभक्तीपर गीते गायनाचा कार्यक्रम होणार आहे.