सुधारणा असतील तर सुचवा, मात्र उगाच... - सर्वोच्च न्यायालय

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 12 d ago
EVM-VVPAT पडताळणी
EVM-VVPAT पडताळणी

 

‘‘कोणत्या तरी यंत्रणेवर आपल्याला विश्‍वास ठेवावाच लागेल. सुधारणा असतील, तर अवश्‍य सुचवा; मात्र उगाच यंत्रणा बंद पाडण्याचा प्रयत्न करू नका,’’ असे आज सर्वोच्च न्यायालयाने ‘व्हीव्हीपॅट’संदर्भातील याचिकांच्या सुनावणीवेळी सुनावले. व्होटर व्हेरीफियेबल पेपर ऑडिट ट्रेलच्या (व्हीव्हीपॅट) संपूर्ण पावत्यांची मोजणी केल्यास मानवी हस्तक्षेप वाढेल, यातून अनेक समस्या निर्माण होईल, असे मत आज न्यायाधीशांनी व्यक्त केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १८ एप्रिलला होणार आहे.

असोशिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर आज न्या. संजीव खन्ना व न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. या याचिकेत याचिकाकर्त्यांनी प्रामुख्याने दोन मुद्यांवर भर दिला आहेत. 

‘ईव्हीएम’मध्ये फेरफार होऊ शकतो असा दावा करतानाच, मतदाराला आपले मत योग्य व्यक्तीला दिले आहे, याचा विश्वास बसावा यासाठी व्हीव्हीपॅट पावत्यांची शंभर टक्के मोजणी करण्यात यावी; यातून मतदारांच्या मनातील संशय दूर होईल, असा दावा ‘एडीआर’चे वकील प्रशांत भूषण यांनी केला. यावर जवळपास दोन तास युक्तिवाद झाला. युक्तिवादानंतर खंडपीठाने आपले निरीक्षण मांडून पुढील सुनावणी १८ एप्रिलला, म्हणजे पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी ठेवली आहे.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे
प्रशांत भूषण म्हणाले, ‘‘व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी न्यायालयाने ग्राह्य मानली आहे. त्यामुळेच मोजणी केल्या जाणाऱ्या व्हीव्हीपॅट पावत्यांची संख्या वाढवावी. ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार झाल्याचा आमचा दावा नाही, मात्र ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमध्ये फेरफार करता येऊ शकते. कारण या दोन्ही यंत्रांमध्ये प्रोग्रामेबल चीप असते. यात खोडसाळपणा करता येऊ शकतो.’’ 

याचिकाकर्त्यांची नेमकी अपेक्षा काय, असे विचारले असता भूषण यांनी तीन प्रस्ताव ठेवले. मतदान मतपत्रिकेद्वारे व्हावे; मतदाराला व्हीव्हीपॅट पावती मिळावी, ही पावती एका डब्यात टाकण्याची मुभा मतदाराला द्यावी आणि व्हीव्हीपॅट मशीनची काच पारदर्शक असावी व शंभर टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात यावी, या तीन मागण्या ‘एडीआर’तर्फे करण्यात आल्या.

यावर न्या. संजीव खन्ना म्हणाले, साधारणतः मानवी हस्तक्षेप हा समस्या निर्माण करीत असतो. मानवी हस्तक्षेप झाल्यास दुरुपयोगाची शक्यता जास्त असते. मानवी हस्तक्षेप न झाल्यास मशीन साधारणतः योग्य काम करते. मानवी हस्तक्षेप वाढल्यास निश्चितपणे यात समस्या निर्माण होईल. मानवी हस्तक्षेप किंवा अनधिकृत बदल झाल्यास यात निर्माण होईल. या मुद्यांवर आपण युक्तीवाद करता येऊ शकतो.