निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातच हजारो कोटी जप्त

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 13 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. पारदर्शक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. नेत्यांच्या भाषणांवर आयोगाचं लक्ष आहे. याशिवाय अवैध पैशांच्या व्यवहारांवरही कारवाई करण्यात येत आहे.
 
यातच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत एकूण ४६५० कोटी रुपये जप्त केले आहेत. देशातील लोकसभा निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक जप्ती आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
 
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जप्त केलेली रक्कम २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा जास्त आहे. निवडणूक आयोगाने सांगितलं की, अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीआधी १ मार्चपासून दरदिवशी कारवाई करत १०० कोटींहून अधिक रक्कम जप्त केली आहे.

याबद्दल बोलताना आयोगाने सांगितलं आहे की, "२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसह निवडणूक आयोगाने देशातील लोकसभा निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वाधिक जप्तीची नोंद केली आहे. या जप्तीत पथकात फ्लाइंग स्क्वॉड आणि सांख्यिकी निरीक्षण पथकाचा समावेश आहे. तसेच या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये रोख रक्कम, दारू, मोफत वस्तू आणि मादक पदार्थांची कोणतीही हालचाल किंवा वितरण होणार नाही, याची खात्री करण्यासाठी व्हिडिओ पाहणारे पथके आणि सीमा चौक्या सतत २४ तास कार्यरत आहेत.''
 
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केली आहे.