प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध मोठी मोहीम राबवत 'जैश-ए-मोहम्मद' (JeM) या संघटनेच्या एका टॉप कमांडरचा खात्मा केला आहे. शुक्रवारी (२३ जानेवारी २०२६) कठुआ जिल्ह्यातील बिल्लावार भागात झालेल्या अवघ्या काही मिनिटांच्या चकमकीत सुरक्षा दलांनी या पाकिस्तानी दहशतवाद्याला कंठस्नान घातले.
जम्मू रेंजचे पोलीस महानिरीक्षक (IGP) भीम सेन तुती यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमधील बिल्लावारच्या परहेतर भागात लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली होती. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख उस्मान उर्फ 'अबू माविया' अशी पटली आहे. तो जैश-ए-मोहम्मदचा अत्यंत धोकादायक कमांडर असून गेल्या दोन वर्षांपासून उधमपूर-कठुआ पट्ट्यात सक्रिय होता. उस्मानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असून, त्यात 'M4' या अमेरिकन बनावटीच्या स्वयंचलित रायफलचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानने फेब्रुवारी २०२४ मध्ये अन्य १० दहशतवाद्यांसह सीमा ओलांडून भारतात घुसखोरी केली होती. तो अनेकदा सुरक्षा दलांच्या तावडीतून निसटला होता. ७ आणि १३ जानेवारी रोजी अनुक्रमे कहोग आणि जोतच्या जंगलात झालेल्या चकमकीतूनही तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र, शुक्रवारी एका घरावर टाकलेल्या छाप्यात त्याने गोळीबार सुरू केला असता, सुरक्षा दलांनी त्याला प्रत्युत्तर देत काही मिनिटांतच ठार केले.
दुसरीकडे, किश्तवार जिल्हयातील छत्रू परिसरात गेल्या सहा दिवसांपासून 'ऑपरेशन त्राशी-I' सुरू आहे. येथील सोन्नर आणि मद्राल-सिंगपुरा भागात जैशच्या इतर तीन दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. बर्फवृष्टी आणि कठीण भूप्रदेश असूनही लष्कर आपले शोधकार्य सुरूच ठेवून आहे. या मोहिमेत आतापर्यंत एक पॅराट्रूपर शहीद झाला असून सात जवान जखमी झाले आहेत. २६ जानेवारीपूर्वी सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी जम्मू विभागात सुरक्षा व्यवस्था प्रचंड कडक करण्यात आली आहे.