अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ शनिवारी त्यांच्या पहिल्या चार दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. कोलकात्यात आगमन झाल्यानंतर त्यांनी सेंट तेरेसा यांच्या 'मदर हाऊस' या मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या मुख्यालयाला भेट दिली. १४ वर्षांनंतर अमेरिकेच्या कोणत्याही परराष्ट्र सचिवांनी कोलकाता शहराला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मार्को रुबिओ यांचे सकाळी कोलकाता विमानतळावर आगमन झाले, जिथे भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गॉर यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर रुबिओ यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या मुख्यालयात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. राजदूत गॉर आणि इतर अधिकाऱ्यांसह त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीद्वारे चालवल्या जाणाऱ्या 'निर्मला शिशू भवन' या बालगृहालाही भेट दिली.
भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध आणि धोरणात्मक चर्चा
मदर तेरेसा यांनी कोलकात्यात स्थापन केलेली 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' ही संस्था जगभरातील गरीब, आजारी आणि गरजू लोकांची सेवा करण्यासाठी ओळखली जाते. रुबिओ यांची ही भेट राजनैतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या मोठ्या राजकीय बदलानंतर म्हणजेच भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर काही आठवड्यांतच ही भेट झाली आहे.
अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गॉर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर सांगितले की, परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ कोलकात्यात दाखल झाले असून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. कोलकाता येथील भेटीनंतर ते नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. पुढील काही दिवसांत भारत आणि अमेरिकेत व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण, 'क्वाड' (QUAD) संघटना आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
२०१२ मध्ये हिलरी क्लिंटन यांनी कोलकाता शहराला भेट दिली होती, त्यानंतर रुबिओ हे कोलकाता येथे येणारे पहिले अमेरिकन परराष्ट्र सचिव ठरले आहेत. २३ ते २६ मे दरम्यान होणाऱ्या या भारत दौऱ्यात ते आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीलाही भेट देणार आहेत. या दौऱ्यात क्वाड देशांच्या मंत्र्यांची बैठक आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण चर्चा देखील नियोजित आहे.