पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, या प्रीमियम ट्रेनची व्यावसायिक सेवा सुरू होण्यापूर्वीच रेल्वेने तिकीट रद्द करण्याच्या (Cancellation) शुल्काबाबत अत्यंत कडक नियम जाहीर केले आहेत. नव्या अधिसूचनेनुसार, या ट्रेनमध्ये तिकीट रद्द केल्यावर मिळणाऱ्या परताव्याच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर कपात केली जाणार आहे.
रेल्वेने जारी केलेल्या नियमांनुसार, जर एखादे निश्चित (Confirmed) तिकीट गाडी सुटण्याच्या वेळेपूर्वी ७२ तासांपेक्षा जास्त काळ आधी रद्द केले, तर एकूण भाड्याच्या २५ टक्के रक्कम कपात केली जाईल. म्हणजेच प्रवाशाला केवळ ७५ टक्के रक्कम परत मिळेल.
जर हे तिकीट गाडी सुटण्यापूर्वी ७२ तास ते ८ तास या दरम्यान रद्द केले, तर कपातीचा आकडा थेट ५० टक्क्यांवर जाईल. याचा अर्थ प्रवाशाला निम्मीच रक्कम परत मिळेल. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे, गाडी सुटण्यापूर्वी ८ तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ उरला असताना तिकीट रद्द केले, तर कोणताही परतावा (Refund) मिळणार नाही. तसेच, जर तिकीट रद्द केले नाही किंवा 'टीडीआर' (TDR) ऑनलाइन भरला नाही, तरीही प्रवाशाला एक रुपयाही परत मिळणार नाही.
इतर महत्त्वाचे बदल आणि कोटा:
रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे की, वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी किमान ४०० किलोमीटर अंतराचे भाडे आकारले जाईल. तसेच या ट्रेनमध्ये 'आरएसी' (RAC) म्हणजेच 'रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन'ची कोणतीही सुविधा नसेल. एक तर तिकीट कन्फर्म असेल किंवा वेटिंगवर असेल.
या ट्रेनमध्ये महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि ड्युटी पास यांसाठीच ठराविक कोटा असेल. याव्यतिरिक्त इतर कोणताही विशेष कोटा या ट्रेनमध्ये लागू नसेल. या महिन्यापासून सुरू झालेल्या 'अमृत भारत-II' एक्सप्रेससाठी देखील किमान २०० किमी अंतराचे भाडे निश्चित करण्यात आले असून तिथेही 'आरएसी'ची सोय नसेल. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या नवीन नियमांची दखल घेणे आवश्यक आहे.