उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 d ago
उपराष्ट्रपती जगदीप धनकड
उपराष्ट्रपती जगदीप धनकड

 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनकड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार तब्येतीला प्राधान्य देण्याचा निर्णय आपण घेतला असून त्यामुळे पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. "पदावर असतानाच्या काळात केलेले सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे," अशा शब्दांत धनकड यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले.

राज्यघटनेच्या ६७कलम-(अ) नुसार धनकड यांनी राजीनामा दिला आहे. या कलमाखाली दिलेला राजीनामा तत्काळ प्रभावाने लागू होतो. "उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत असताना देशाची उल्लेखनीय आर्थिक प्रगती पाहता आली, ही आपल्यासाठी सौभाग्याची आणि आनंदाची बाब आहे. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मंत्रिमंडळातील सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आपण त्यांचेही आभारी आहोत," असे धनकड यांनी म्हटले आहे. धनकड हे २०२२ मध्ये उपराष्ट्रपती बनले होते. तत्पूर्वी २०१९ ते २०२२ या काळात ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. राज्यातील तृणमूल सरकार सोबतची त्यांची जुगलबंदी चर्चेत राहिली होती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.

अशी झाली होती निवड
पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनकड ६ ऑगस्ट २०२२ रोजी देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले होते. त्यांनी 'यूपीए'च्या उमेदवार मागरिट अल्वा यांचा पराभव केला. त्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. १८ मे १९५१ रोजी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील दुर्गम गावात किथाना (आदिवासी क्षेत्र) येथे त्यांचा जन्म झाला. गावातून इयत्ता पाचवीपर्यंत आणि त्यानंतर चित्तोडगडच्या सैनिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात पदवी पूर्ण केल्यानंतर राजस्थान विद्यापीठातून त्यांनी 'एलएलबी' केले. त्यांनी १९७७ पासून राजस्थान उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. धनकड हे १९८६ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष बनले. ते बार कौन्सिलचेही सदस्य राहिले आहेत. धनकड यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली.

राजकीय कारकीर्द
सन १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत ते जनता दलाचे उमेदवार म्हणून झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर त्यांनी १९९० मध्ये व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यांनी १९९१ मध्ये जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकिटावर १९९१ मध्ये त्यांनी अजमेरमधून लोकसभा निवडणूक लढवली; परंतु भाजपच्या रसासिंग रावत यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. धनकड हे १९९३ मध्ये अजमेर जिल्ह्यातील किशनगड मतदारसंघातून राजस्थान विधानसभेवर निवडून आले होते. वसुंधराराजे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर २००३ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा आणि राजस्थान विधानसभेतील महत्त्वाच्या समित्यांचा ते भाग होते. ते राजस्थान ऑलिंपिक असोसिएशन आणि राजस्थान टेनिस असोसिएशनचे अध्यक्षही होते. नंतर जुलै २०१९ मध्ये त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

निवडणूक घ्यावी लागणार
उपराष्ट्रपती पद रिक्त असल्यास त्यानंतरची प्रक्रिया राज्यघटनेच्या ६८व्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. निधन, राजीनामा किंवा पदावरून हटविल्यामुळे उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास पद भरण्यासाठी लवकरात लवकर निवडणूक घ्यावी लागते. ही निवड पूर्ण कालावधीसाठी असते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदार असतात. तर, उपराष्ट्रपती राज्यसभेचा अध्यक्ष असतो. त्यामुळे हे पद रिक्त असल्यास राज्यसभेचा उपाध्यक्ष सभागृहाचे कामकाज चालवितो. याआधी, १९६९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती झाकिर हुसेन यांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. त्या निवडणुकीसाठी उपराष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे जुलै १९८७मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठीच आर. व्यंकटरमण यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता. सभापती म्हणून काम करताना देखील त्यांनी अनेकदा छाप पाडली होती. छातीत दुखत
असल्याच्या तक्रारीवरून दोन महिन्यांपूर्वी त्यांना 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.