उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्याने संसदेत खळबळ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
उपराष्ट्रपती जगदीप धनकड
उपराष्ट्रपती जगदीप धनकड

 

उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्याचे पडसाद आज संसद परिसरात उमटले. यामुळे आज दोन्हीही सभागृहांमध्ये काहीही कामकाज होऊ शकले नाही. मात्र संसद भवनाच्या परिसरात राजीनाम्याचीच चर्चा रंगली. विरोधी पक्षांनी राजीनाम्यामागचे अंदाज बांधताना सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, तर सत्ताधारी मंत्री, खासदारांनी यावर अक्षरशः मौन पाळणे पसंत केले.

संसदेचे अधिवेशन कालपासून सुरू झाले. मात्र पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी पदाचा राजीनामा दिला. वैद्यकीय सल्ल्यानुसार आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी राजीनामा देत असल्याचे धनकड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले. राजीनामा स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती कार्यालयाने गृह मंत्रालयाकडे पाठवला. गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली. यानंतर राज्यसभेमध्ये उपसभापती हरिवंश यांनी तर लोकसभेमध्ये तालिका सभापती घनश्याम तिवारी यांनी राजीनाम्याची औपचारिक माहिती दिली. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगदीप धनकड यांना शुभेच्छा देणारा संदेश सोशल मीडियावर पोस्ट केला. याच घटनाक्रमात उपसभापती हरिवंश यांनी राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांची भेट घेतली. दरम्यान, उपराष्ट्रपतींच्या अचानक झालेल्या राजीनाम्यामुळे संसद भवन परिसरामध्ये राजकीय अटकळबाजीला उधाण आले. विरोधी पक्षांनी राज्यसभेच्या कामकाजविषयक सल्लागार समितीच्या बैठकीत सभागृह नेते व मंत्री जे. पी. नड्डा आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या अनुपस्थितीशी राजीनाम्याचा मुद्दा जोडण्याचा प्रयत्न केला, खासदार जयराम रमेश यांनी राजीनाम्यामागे वैद्यकीय कारणापलीकडे वेगळे कारण असल्याची टिप्पणी केली.
रमेश म्हणाले, काल दुपारी एक ते साडेचार या दरम्यान काही तरी घडल्यामुळेच मंत्री नड्डा व मंत्री रिजिजू हे बैठकीत आले नाहीत. त्यानंतर उपराष्ट्रपतींनी धक्कादायक पाऊल उपराष्ट्रपतीपदाचारा असा दावा रमेश यांनी केला. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून याचा स्पष्ट शब्दात इन्कार करण्यात आला. मंत्री नड्डा यांनी स्पष्ट केले, की पहिल्या बैठकीत आपण आणि संसदीय कार्यमंत्री रिजिजू दोघेही उपस्थित होते. मात्र दुपारी साडेचारला झालेल्या बैठकीत संसदीय कामकाजातील व्यग्रतेमुळे जाता आले नव्हते आणि त्याबद्दल सभापतींना पूर्वकल्पना दिली होती.

आरोग्य मंदिरांवर शंभर कोटींहून अधिक खर्च
राष्ट्रीय आयुष मिशन (एनएएम) ३९० अंतर्गत महाराष्ट्रात आयुष्यमान आरोग्य मंदिरे कार्यरत असून २०२४-२५ मध्ये या केंद्रांवर १०८.८२ कोटी रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी राज्यसभेत अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या सुनेत्रा पवार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
आयुष्यमान आरोग्य मंदिर योजनेसाठी वर्ष २०२४-२५ मध्ये १३३.५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातील १०८.८२ कोटी रुपये खर्च झाल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान आयुर्वेदिक औषधांच्या चुकीच्या जाहिराती करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारने आयुष सुरक्षा पोर्टल सुरू केले असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
राज्यसभेतील भाजपचे सदस्य अशोक चव्हाण यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. गत मे महिन्यात हे पोर्टल सुरू करण्यात आले होते. पोर्टल अंतर्गत चुकीच्या आणि आक्षेपार्ह जाहिराती करणाऱ्यांची माहिती दे ण्यासाठी केंद्रिकृत डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे.

कयास आणि अंदाज
अधिवेशन सुरू होण्याआधीच धनकड हे पदाचा राजीनामा देऊ शकले असते, तसे न करता अधिवेशनाचा पहिला दिवस निवडण्याचे कारण काय हा सवाल विरोधकांचा होता. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी राजीनाम्यामागची कारणे सांगताना वेगवेगळे अंदाज व्यक्त केले. राज्यसभा सचिवालयातील नियुक्त्यांवरून उपराष्ट्रपतींबद्दल भाजपचे वरिष्ठ मंत्री नाराज असल्याचा उल्लेख करण्यात आला. तर न्या. यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रकरणामध्ये सरकारकडून पुढाकार घेत असताना आणि लोकसभेत अध्यक्षांकडे त्याबाबतची सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या खासदारांच्या सह्या असलेली नोटीस सादर केली असताना राज्यसभेमध्ये मात्र सभापती जगदीप धनकड यांनी या महाभियोगाबाबत विरोधी पक्षांच्याच ६८ खासदारांच्या सह्या असलेली नोटीस स्वीकारणे सरकारला पसंत पडले नाही. याशिवाय न्या. वर्मावरील महाभियोगाच्या प्रस्तावाला न्या. शेखर यादव यांच्यावरील महाभियोगाचा
प्रस्ताव जोडला जाण्याची भीती सरकारला वाटत असल्याने उपराष्ट्रपतींना राजीनामा द्यावा लागला असावा, असा अंदाज एका खासदाराने व्यक्त केला. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये धनकड यांनी सरकारच्या नेतृत्वाविषयी नाराजीची भावना मांडायला सुरवात केली होती. याचा परिपाक म्हणून त्यांचा राजीनामा झाला असावा, असाही कयास अन्य एका खासदाराने बोलून दाखवला. भाजपच्या खासदारांनी मात्र या संपूर्ण घटनाक्रमावर अनभिज्ञता व्यक्त केली.