तामिळनाडूमध्ये उत्तर भारतीयांवरील हल्यांच्या बातम्या या निव्वळ अफवाच!

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
हिंदी भाषिक स्थलांतरितांवरील हल्यांच्या अफवेने गोंधळाची स्थिती
हिंदी भाषिक स्थलांतरितांवरील हल्यांच्या अफवेने गोंधळाची स्थिती

 

तमिळनाडूत हिंदी भाषिक स्थलांतरितांवर हल्ले झाल्याच्या अफवेने राज्यासह उत्तर भारतात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र बिहार सरकार तसेच तमिळनाडू सरकार यांनी तातडीने उचलेल्या परिणामकारक पावलांमुळे विश्‍वासाचे वातावरण निर्माण करता आले. यानिमित्ताने, सोशल मीडियावरून विखारी प्रचार करून असंतोष माजवणाऱ्यांचे पितळही उघडे पडले.

तमिळनाडूने आग्रहाने द्वैभाषिक धोरण स्वीकारत हिंदी भाषा लादण्याला आतापर्यंत सातत्याने विरोध केला आहे. नवोदय विद्यालयांमध्ये हिंदी पहिली किंवा दुसरी भाषा असल्याने केंद्र सरकारच्या या योजनेविरोधात तमिळनाडूने बंडही केले होते. एवढंच नव्हे तर हिंदीभाषक कामगारांच्या सोयीसाठी हिंदीत फलक लावल्याने राज्य परिवहन महामंडळाने बसचालकाला निलंबीत केले होते. मात्र, सध्या चित्र उलट दिसत आहे. राज्याचे कामगार खाते, जिल्हा प्रशासन आणि पोलिस खाते स्थलांतरित कामगारांना समोर ठेवून हिंदीत उद्घोषणा करत आहेत. विशेषतः बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातून आलेल्या कामगारांच्या मनातील भीती त्याद्वारे दूर करू पाहात आहे. तमिळींनी त्यांना लक्ष्य केलेले नाही, हे ऐकवत आहे.
 
द्रविडींच्या सरकारच्या द्विभाषिक (तमिळ व इंग्लिश) धोरणात अमूलाग्र बदल झाला आहे, ते सौम्य झाले आहे, असे मात्र अजिबात नाही. तथापि, स्थलांतरित मजुरांचे आपापल्या राज्यात अशा प्रकारे ओघ सुरू राहिल्यास राज्याच्या अर्थकारणासमोर पेच येऊ नये, ही भूमिका आहे. राजकीय हेव्यादाव्यातून फेक व्हिडिओ आणि अफवा पसरवणाऱ्या व्हिडिओंमुळे हिंदीभाषक आणि खास करून बिहारी कामगार आपापल्या घरी भीतीपोटी आणि जीव वाचवण्यासाठी परतत असल्याने तातडीची पावले उचलली गेली आहेत.

स्थलांतरितांचे योगदान
गेल्या पंधरा वर्षांत उत्तर भारतीयांनी तमिळनाडूतील उद्योगधंदे, बांधकाम आणि पायाभूत सुविधांची कामे, तयार कपडे, निर्यातप्रधान क्षेत्रे, सलून, पेट्रोलपंप, रिटेल शोरूम अशा ठिकाणी कामगार म्हणून बस्तान बसवले आहे. त्यांची संख्या सुमारे दहा लाखांच्या घरात आहे. प्रामुख्याने कोईम्बतूर व परिसरातील वस्त्रोद्योग आणि निर्यातक्षम उद्योगांत त्यांचा राबता मोठा आहे, शिवाय राज्यभरातील विविध उद्योगातही ते कार्यरत आहेत. गरीब कुटुंबातील हे कामगार तमिळनाडूत बऱ्यापैकी रोजगार मिळेल म्हणून आले असले तरी येथेही त्यांना तुलनेने कमी मेहनताना मिळताना दिसतो. राज्याच्या अर्थकारणाला त्यामुळे चालना मिळत आहे, तमीळ त्यांच्यावर अवलंबून आहेत. मात्र, विखारी प्रचाराचे बनावट व्हिडिओ आणि अफवांनी हिंदी भाषकांमध्ये घबराट निर्माण झाली. तमिळनाडू हिंदी भाषकांसाठी सुरक्षित राहिले नाही, अशी हाकाटी राज्यभर पिटली गेली आणि वणव्यासारखे हिंदीभाषक नागरिकांनी रेल्वे स्थानकांकडे धाव घेत घरी परतणे पसंत केले.
 
द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) नेते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त उत्तरेतील जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात स्टॅलिन यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या समावेशाची विरोधकांची आघाडी निर्माण करावी, असे आवाहन केले होते. कदाचित भाजप नेतृत्वाला ते रुचले नसावे. त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी, २ मार्च रोजी भेदाभेद निर्माण करणारी ही विखारी अफवा पसरवण्याची हिंसक, दुष्ट मोहीम सुरू करण्यात आली.

स्टॅलिन यांची कठोर भूमिका
स्टॅलिन यांच्या सत्कार कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी एका हिंदी पत्रकाराने खुनाचे दोन व्हिडिओ ट्विट केले आणि हिंदी भाषकांना तमिळनाडूत लक्ष्य केले जात असल्याचा दावा केला. त्यानंतर लगेचच राज्य पोलिसांनी शीघ्र कृतीद्वारे हे व्हिडिओ बनावट असल्याचे दाखवून दिले. त्याहीपुढे जात पोलिसांनी राज्यात वांशिक द्वेषाचे गुन्हे घडलेले नसून, राज्यातील स्थलांतरित कामगार अत्यंत सुरक्षित आहेत, असा निर्वाळा दिला. तोपर्यंत बिहारमध्ये तसेच उत्तर भारतात भाजपच्या सोशल मीडिया विभागाची धुरा सांभाळणाऱ्यांनी तमिळींनी बिहारी आणि हिंदी भाषकांविरोधात मोहीम उघडून त्यांना लक्ष्य केल्याचा दावा करणे सुरू केले.
स्टॅलिन यांनी गैरसमज दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलून राज्याच्या विकासात स्थलांतरित नागरिकांचे योगदान मोठे असून, चुकीच्या बाबी पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशाराही दिला. तमिळनाडूत स्थलांतरित कामगारांबाबत अफवा पसरवणारे देशद्रोही आहेत, ते देशाच्या एकात्मतेला बाधा आणताहेत, असेही ते म्हणाले. स्टॅलिन यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वस्तुस्थिती विषद केली आणि परिस्थिती सुरळीत असल्याचे स्पष्ट केले होते.

प्रशासनाची दक्षता
दरम्यान विरोधकांच्या वाढत्या दबावानंतर बिहार सरकारने तमिळनाडूत सत्यशोधनासाठी समिती पाठवली. बालमुरूगन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राज्याच्या विविध भागात पाहणी करून स्थलांतरितांचे प्रश्न जाणून घेत वस्तुस्थिती समजून घेतली. मग त्यांनी हल्ले आणि सोशल मीडियावर पसरवलेले व्हिडिओ बनावट असल्याचे स्पष्ट केले. अधिकारी आणि पोलिसांचे आभार मानत या पथकाने स्थलांतरित कामगार सुरक्षित असल्याचा निर्वाळा देत बिहार गाठले.
 
राज्याचे पोलिस महासंचालक सेलेंद्र बाबू यांनी इंग्रजी टीव्ही चॅनलवाल्यांना स्थलांतरितांच्या तमिळनाडूतील स्थितीविषयी वस्तुस्थिती स्पष्ट केली. तसेच विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी विविध जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांनी त्या-त्या भागातील स्थलांतरितांचे व्हॅटस्ॲप ग्रुप तयार केले आणि त्यावरून वस्तुनिष्ठ माहिती सातत्याने पुरवत राहिले तसेच हेल्पलाईनबाबतही माहिती देत राहिले. स्थलांतरितांच्या वस्त्यांमध्ये पोलिसांच्या गस्तीही वाढवल्या. त्यामुळे स्थलांतरितांना दिलासा मिळाला. आता होळी संपल्याने त्यानिमित्ताने गावी परतलेली मंडळीही तमिळनाडूत पुन्हा परतू लागली आहे. जनजीवन पूर्वपदावर येत आहे