"ड्रॅगन आणि हत्तीने एकत्र यायलाच हवे," शी जिनपिंग यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

 

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत, "चीन आणि भारताने मित्र असणे आणि 'ड्रॅगन व हत्ती'ने एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे आहे," असे म्हटले आहे.

सध्या जगभरात अशांतता आणि उलथापालथ सुरू असल्याचे नमूद करत, शी जिनपिंग म्हणाले की, "चीन आणि भारत या दोन प्राचीन संस्कृती, दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आणि 'ग्लोबल साऊथ'चे महत्त्वाचे सदस्य म्हणून, एकमेकांचे यश सुलभ करणारे चांगले शेजारी आणि मित्र बनणे, हाच योग्य पर्याय आहे."

SCO शिखर परिषदेसाठी चीनमध्ये आलेल्या पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना शी जिनपिंग म्हणाले, "गेल्या वर्षी, कझानमध्ये आपली यशस्वी भेट झाली होती आणि तेव्हापासून चीन-भारत संबंध पुन्हा एकदा नव्या सुरुवातीसह रुळावर आले आहेत. दोन्ही बाजूंनी आपण ठरवलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अंमलबजावणी केली आहे आणि तेव्हापासून द्विपक्षीय देवाणघेवाण आणि सहकार्यात नवीन प्रगती झाली आहे."

"आज जग शतकातील बदलांमधून जात आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर आणि अशांत आहे. आपण दोन्ही देश आपल्या लोकांचे जीवनमान उंचावण्याची, विकसनशील देशांना एकत्र आणण्याची आणि मानवी समाजाच्या प्रगतीला चालना देण्याची ऐतिहासिक जबाबदारी उचलत आहोत," असेही ते म्हणाले.

यावर पंतप्रधान मोदी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. "परस्पर विश्वास, आदर आणि संवेदनशीलतेच्या आधारावर" भारत-चीन संबंध पुढे नेण्यासाठी आपण "वचनबद्ध" असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीमेवरील सैन्य माघारीनंतर "शांतता आणि स्थिरतेचे वातावरण" निर्माण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.