जेव्हा जफर सरेशवाला यांनी 'आरएसएस'च्या मुख्यालयात अदा केली नमाज

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 d ago
जफर सरेशवाला
जफर सरेशवाला

 

नवी दिल्ली:

गुजरातचे प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते जफर सरेशवाला यांनी भारतीय मुस्लिमांच्या समस्यांवर एक महत्त्वाचे भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एकेकाळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सरेशवाला म्हणतात की, जर मुस्लिमांना आपल्या समस्यांचे समाधान हवे असेल, तर त्यांनी हिंदू समुदायाशी अराजकीय स्तरावर संवादाची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे.

एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान बोलताना सरेशवाला यांनी नमूद केले की, भारतात ८५ टक्के लोकसंख्या हिंदू धर्मीय आहे, हे मुस्लिमांनी मान्य करायला हवे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही देशातील सर्वात मोठी हिंदू संघटना असून भाजप हा तिचाच एक भाग आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही.

संवादाची गरज आणि वास्तव

सरेशवाला यांच्या मते, देशातील प्रमुख घटनात्मक पदे, मग ते पंतप्रधान असोत, लोकसभेचे अध्यक्ष असोत, उपराष्ट्रपती असोत किंवा बहुतांश राज्यांचे मुख्यमंत्री असोत, हे सर्वजण संघ विचारांचे आहेत. त्यामुळे तार्किकदृष्ट्या विचार करता, जर भारतीय मुस्लिमांना काही समस्या असतील, तर त्यांनी हिंदूंसोबत अराजकीय पातळीवर चर्चा सुरू केली पाहिजे. "मुस्लिम व्यावसायिक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यांच्या हिंदू समकालीनांशी संवाद साधायला हवा," असे त्यांनी सुचवले.

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याने 'आरएसएस'च्या एका बैठकीला हजेरी लावल्याबद्दल काँग्रेसने त्याच्यावर टीका केली होती. काँग्रेसने या बैठकीला "द्वेष पसरवणारी बैठक" असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर सरेशवाला यांनी संघासोबतचा आपला वैयक्तिक अनुभव शेअर केला.

नागपूरच्या संघ मुख्यालयातील 'तो' अनुभव

२०१७ सालची आठवण सांगताना ते म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत यांचे बंधू आणि संघ नेते यांनी त्यांना लष्करी नेत्यांशी संवाद साधण्यासाठी नागपूरच्या संघ मुख्यालयात आमंत्रित केले होते. सरेशवाला सांगतात, "माझी एकच अट होती की, मला मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी मोहन भागवत यांच्यासोबत स्वतंत्रपणे ४५ मिनिटे मिळावीत आणि त्यांनी ती अट मान्य केली."

ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालल्याने त्यांच्या मुक्कामाची सोय संघ मुख्यालयातच करण्यात आली होती. "नमाज अदा करण्यासाठी जवळच्या मस्जिदचा पत्ता मी त्यांना विचारला. पण माझ्या आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यांनी माझ्यासाठी तिथेच पांढरी जाजम (नमाजसाठीचे आसन) तयार ठेवली होती आणि मला काबाची (किबला) दिशाही दाखवली," असे सरेशवाला यांनी सांगितले.

या अनुभवामुळे त्यांचा हा विश्वास अधिक दृढ झाला की, देशातील मुस्लिमांसाठी संवादापेक्षा उत्तम मार्ग दुसरा कोणताही नाही आणि संघसारख्या संघटनेपेक्षा चांगला संवादक असू शकत नाही. त्यांनी टीव्ही कार्यक्रमात असेही सांगितले की, त्यांच्या स्वतःच्या ऑफिसमध्येही त्यांनी एक प्रार्थना कक्ष सुरू केला आहे, जिथे सर्व धर्माचे लोक आपापल्या पद्धतीनुसार प्रार्थना करू शकतात; तो केवळ मुस्लिमांच्या नमाजसाठी मर्यादित नाही.

 

मैत्री आणि सहिष्णुतेचे उदाहरण

आपले अनुभव सांगताना सरेशवाला यांनी त्यांचे मित्र दिवंगत कवी मुनव्वर राणा यांचाही उल्लेख केला. राणा नेहमी सांगायचे की, रमजानच्या काळात 'पांचजन्य' मासिकाचे माजी संपादक तरुण विजय यांच्या घरी त्यांच्यासाठी इफ्तार आणि नमाजची जय्यत तयारी केली जायची. यावरून हेच सिद्ध होते की, संवाद आणि सहिष्णुता केवळ औपचारिक बैठकीपुरती मर्यादित नसते, तर ती वैयक्तिक पुढाकार, मैत्री आणि सामाजिक संबंधांतूनही जोपासली जाऊ शकते.

सरेशवाला यांनी शेवटी असे ठामपणे सांगितले की, देशातील मुस्लिमांनी हे समजून घेतले पाहिजे की निर्णय घेण्याची आणि प्रभाव टाकण्याची ताकद कोणाकडे आहे. राजकीय किंवा सामाजिक नेतृत्व केवळ सत्ताधाऱ्यांपुरते मर्यादित नसते, तर समाजात प्रभाव टाकणाऱ्या घटकांकडेही ते असते. त्यामुळे संवादाच्या प्रक्रियेतूनच समस्यांवर कायमस्वरूपी आणि प्रभावी तोडगा काढता येणे शक्य आहे, याची साक्षच जणू जफर सरेशवाला यांचा हा अनुभव देतो.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter