केंद्र सरकारने जुन्या फायली, जुन्या कार्यालयीन वस्तू, पेपर रद्दी, जुनी असलेली वाहने विकून चांद्रयान ३ च्या बजेटएवढे पैसे कमावले आहेत. ऑगस्टपासून आतापर्यंत अवघ्या दीड महिन्यात सरकारने ६०० कोटी रुपये कमावले आहेत.
ऑक्टोबरअखेर भंगारातून १००० कोटी रुपये कमावण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. केंद्र सरकार २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत आपले विशेष अभियान ३ सुरू करणार आहे. स्वच्छतेवर भर देणे हा या मोहिमेचा उद्देश असणार आहे.
कमाईचा नवीन विक्रम
एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षीही अशीच एक मोहीम राबविण्यात आली होती ज्यामध्ये ३७१ कोटी रुपये कमावले होते. यावर्षीही ही मोहिम राबवली जाणार आहे. ज्यामध्ये एकूण ४०० कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सरकारला ६२ कोटी रुपयांची कमाई झाली होती. यापूर्वीची मोहिम नोव्हेंबरमध्ये थांबवण्यात आली होती. सरकारला स्वच्छता मोहिमेतून दरमहा २० कोटी रुपये कमाई करण्याचे लक्ष आहे.
या मोहिमेच्या मदतीने सरकारी कार्यालयातील कॉरिडॉर स्वच्छ केले जातील, फायलींनी भरलेले स्टीलचे कॅबिनेट रिकामे केले जातील आणि जुनी वाहने बाहेर काढली जातील.
आकडेवारीनुसार, पहिल्या मोहिमेपासून आतापर्यंत सुमारे ३१ लाख सरकारी फायली भंगारात विकल्या गेल्या आहेत. या मोहिमेच्या मदतीने सरकारी कार्यालयांची अंदाजे १८५ लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या मोहिमेमध्ये ९० लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली होती. यावर्षी १०० लाख चौरस फूट जागा रिकामी करण्याची योजना आखली जात आहे.
मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात सर्व मंत्रालये आणि विभाग सहभागी होतील. तयारीचा टप्पा १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असा असेल आणि अंमलबजावणीचा टप्पा २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू होईल. राज्यमंत्री केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह १४ सप्टेंबर रोजी दिल्लीतून या मोहिमेची घोषणा करणार आहेत.