पैशांशी संबंधित हे ६ नियम बदलणार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, पुढील महिन्यात अनेक पैशांशीसंबंधी नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत, SEBI ने म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यांमध्ये नॉमिनेशन अनिवार्य केले आहे.

याशिवाय २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदतही ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत १ ऑक्टोबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. त्यातील काही नियमांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी.

१. डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांसाठी नॉमिनेशन अनिवार्य

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI ने डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांसाठी नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. त्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. या तारखेपर्यंत कोणत्याही खातेदाराने नॉमिनेशन केले नाही तर ते खाते १ ऑक्टोबरपासून बंद केले जाईल.

अशा परिस्थितीत तुम्ही डीमॅट आणि ट्रेडिंग करू शकणार नाही. यापूर्वी, सेबीने डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांच्या नॉमिनेशनसाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत निश्चित केली होती, जी नंतर आणखी सहा महिन्यांनी वाढवण्यात आली. तुम्ही तुमच्या खात्यात नॉमिनी जोडला नसेल, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा.

२. म्युच्युअल फंडसाठी नॉमिनेशन

डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांव्यतिरिक्त, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी नॉमिनेशन अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी SEBI ने ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. जर तुम्ही नॉमिनेशन प्रक्रिया दिलेल्या मुदतीत पूर्ण केली नाही तर तुमचे खाते गोठवले जाईल. यानंतर तुम्ही यामध्ये गुंतवणूक किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकणार नाही.

३ . TCS नियमांमध्ये होणार बदल

तुम्ही पुढील महिन्यात परदेशात जाण्यासाठी टूर पॅकेज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. तुम्ही ७ लाख रुपयांपेक्षा कमी टूर पॅकेज खरेदी केल्यास तुम्हाला ५ टक्के टीसीएस भरावा लागेल. तर ७ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या टूर पॅकेजसाठी २० टक्के TCS भरावा लागेल.

४ . २००० रुपयांच्या नोटा बदलून देण्याची अंतिम मुदत

जर तुम्ही अजून २००० रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील तर हे काम ३० सप्टेंबरपर्यंत करा. रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांची नोट बदलण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर  २००० रुपयांची नोट चालणार नाही.

५ . जन्म प्रमाणपत्र अनिवार्य

सरकार पुढील महिन्यापासून आर्थिक आणि सरकारी कामाच्या नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे.१ ऑक्टोबरपासून शाळा, महाविद्यालयात प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज, मतदार यादीत नाव जोडणे, आधार नोंदणी, विवाह नोंदणी किंवा सरकारी नोकरीचे अर्ज इ. सर्व कामांसाठी जन्म प्रमाणपत्र आवश्यक असेल.

६ . बचत खात्यासाठी आधार कार्ड आवश्यक

छोट्या बचत योजनांमध्ये आता आधार कार्ड अनिवार्य केले आहे. PPF, सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस स्कीम इत्यादींमध्ये आधारची माहिती देणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास लवकरात लवकर बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ही माहिती भरा, अन्यथा १ ऑक्टोबरपासून ही खाती बंद केली जातील.