बेळगावच्या तापमानाची रेकॉर्ड ब्रेकच्या दिशेने वाटचाल!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 4 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बेळगाव : वाढत्या तापमानाने सात वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक करणे आता शिल्लक राहिले आहे. बेळगावचे तापमान दिवसेंदिवस वाढतच चालले. गुरुवारी (ता. १८) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने जाहीर केलेल्या माहितीनुसार बेळगावचे कमाल तापमान ४०.४ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

 

तर, सांबरा विमानतळावरील हवामान खात्याच्या विभागाकडून शहराचे तापमान ३७.४ इतके नोंदविले गेले आहे. बेळगावचे आतापर्यंतचे सर्वाधिक नोंदविलेले तापमान हे ४०.८ डिग्री सेल्सिअस इतके असून त्याची नोंद २८ एप्रिल २०१६ ला झाली होती. त्यानंतर मागील सात वर्षात कमाल तापमान इतका कधीच वाढला नाही.

 

मात्र, वळीव पाऊस लांबल्याने यंदा हा रेकॉर्ड तुटण्याच्या मार्गावर आहे. शहर परिसरात उष्मा चांगलाच वाढला आहे. दिनांक  १७ रोजी बेळगावचे कमाल तापमान ३७.२ डिग्री सेल्सिअस इतके तर किमान तापमान १९.३ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. मागील दोन दिवसांपासून बाजारपेठेत देखील दुपारच्या वेळेस रस्त्यावर लोकांची संख्या विरळ होत आहे.

 

सायंकाळनंतर बाजारपेठेत गर्दी होत असून लोक खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. उकाडा वाढल्याने पाण्याचा वापर देखील वाढला असून अशातच शहराला पाणीटंचाईचा देखील सामना करावा लागत आहे. वळीव पाऊस लांबल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ महानगरपालिकेवर येऊन ठेपली आहे. बेळगावचे कमाल तापमान ३६ डिग्री सेल्सियस पुढे जात आहे. उन्हाच्या तीव्र झळा पोहोचत असून सर्वच ठिकाणी त्याचा परिणाम दिसून येत आहे.

 

मागील महिन्यात २० एप्रिलला ३९.५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यानंतर शहर तालुक्यात वळीवाच्या पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाली होती. वातावरणातील उष्मा कमी व्हावा यासाठी लोकांच्या नजरा आभाळाकडे लागून राहत आहेत. वाळीव पावसाची हजेरी लागल्यास उष्णता कमी होणार आहे. सध्या प्रत्येक स्मार्टफोनवर वेदर अपडेट (तापमानाची माहिती) एप्लीकेशन आहेत. त्यावर देखील लोक सर्च करून पाऊस कधी पडणार? तापमान किती वाढत आहे? याची माहिती घेत आहेत.