'तेंडल्या' या चित्रपटामुळं बदललं 'या' दोघांचं नशीब!

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 10 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इस्लामपूर : नुकत्याच रिलीज झालेल्या 'तेंडल्या' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील दोन युवा चेहरे चांगलेच झळकले आहेत. इस्लामपूर येथील युवा अभिनेता फिरोज शेख आणि येडेनिपाणी येथील बालअभिनेता अमन कांबळे या दोघांची 'तेंडल्या' चित्रपटातील भूमिका अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

 

दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील असून मराठी चित्रपटसृष्टीत या दोघांच्या नावाने राज्य पुरस्कारावर मोहोर उमटली आहे. दोघांनाही अभिनयाचे कसलेही शिक्षण घेतलेले नसतानाही आपल्या नैसर्गिक अभिनयातून रसिकांची मने जिंकली आहेत. तेंडल्या'ला मिळालेल्या एक राष्ट्रीय व पाच राज्य पुरस्कारांमध्ये दोघांचाही पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे.

 

दिग्गज क्रिकेटपटू, भारतरत्न डॉ. सचिन तेंडुलकर यांच्या प्रेमापोटी इस्लामपूरचा युवा दिग्दर्शक सचिन जाधव याने 'तेंडल्या' नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १९९० च्या दशकामध्ये सचिन तेंडुलकरवर प्रेम करणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी टीव्हीवर सचिनचे सामने पाहता यावेत म्हणून केलेले प्रयोग, धडपड, घेतलेली मेहनत आणि सचिनच्या आयुष्याकडून घेतलेले धडे व त्याचा प्रेरणादायी प्रवास या अनुषंगाने तेंडल्या या चित्रपटाची कथा रसिकांना मनोरंजनाबरोबरच प्रेरणा देण्याचे काम करत आहे.

 

फिरोजचा अत्यंत खडतर प्रवास

५ मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला असून सध्या पश्चिम महाराष्ट्रातील विविध चित्रपटगृहांमध्ये तो झळकला आहे. या चित्रपटातील एकमेकांना समांतर चालणाऱ्या दोन कथा क्रिकेटप्रेमाच्या आणि सचिनप्रेमी, चाहत्यांच्या आहे. या दोन्ही कथांचे नायक फिरोज आणि अमन हे आहेत.

 

रात्रंदिवस झटून आपल्या स्वप्नातील ध्येय साध्य करण्यासाठी धडपड करणारे नायक या दोघांनी अभिनयातून साकारले आहेत. फिरोजचा प्रवास अत्यंत खडतर आहे. मुस्लिम समाजातील प्रथा, परंपरा सांभाळून शिक्षण घेत पदवीचे शिक्षण घेतले. पदवीधर असूनही होमगार्डची नोकरी करत अभिनयाची आवड जोपासली.

 

पदार्पणातील उत्कृष्ट अभिनेता

केबीपी कॉलेजच्या वातावरणात अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य, कार्यकर्ता, पथनाट्ये, एनएसएस कॅम्प, स्नेहसंमेलन, एकांकिका, नाट्य स्पर्धा यातून पुढे आला. नंतर व्यवसाय असावा म्हणून फिरोजने टोनर प्रिंटरचे दुकान टाकले.

 

सोबतीला जोडधंदा म्हणून एडिटिंगचे काम केले. सध्या फोटोग्राफी करत आहे. पदर्पणातील उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याला राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अमन हा वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी गावचा विद्यार्थी आहे.

 

अभिनयाला प्राधान्य देणार - अमन

वडील शिरोली-कोल्हापूर औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत नोकरी करतात. तो अण्णासाहेब डांगे यांच्या आश्रमशाळेत सातवीत शिकत असताना स्नेहसंमेलनात एका नाटकात त्याचा अभिनय पाहून लिफ्ट मिळाली.

 

मुलाणी नावाच्या शिक्षकांनी दिग्दर्शक सचिन जाधवकडे शिफारस केली. सध्या कोल्हापूर येथेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत तो बीएससी दुसऱ्या वर्गात शिकत आहे.

 

तेंडल्यामधील उत्कृष्ट बालकलाकार म्हणून राज शासनाने त्याला गौरवले आहे. फिरोजला अभिनयात करियर करायचे आहे; किंबहुना ती त्याची पॅशन आहे. अमनने शिक्षण पूर्ण करत अभिनयाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

 

चित्रपटांत २५ बालकलाकारांचा सहभाग

तेंडल्या चित्रपटांमध्ये वाळवा शिराळा तालुक्यासह आजूबाजूच्या भागातील जवळपास २५ बालकलाकारांचा सहभाग आहे. या बालकालाकारांकडून अभिनय करून घेण्याची कसरत निर्माता-दिग्दर्शक सचिन जाधव, चैतन्य काळे आणि नचिकेत वाईकर यांनी सुरेखरित्या साकारली आहे.

 

असे म्हटले जाते, की ज्याची पहिली निर्मिती असेल त्याने लहान मुले आणि प्राण्यांना चित्रपटात घेण्याचे धाडस करू नये; परंतु नेमके लहान मुलांना घेऊन चित्रपट करण्याचे धाडस यशस्वीरित्या या दिग्दर्शक निर्मात्यांनी साधले आहे, त्यामुळेही या चित्रपटाचे विशेष कौतुक आहे.