बिप्लब देव
इच्छाशक्ती आणि अफाट मेहनत असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करत होजाईच्या एका लेकीने सिद्ध केलंय. आसाम ज्युडिशिअल सर्व्हिस परीक्षेत दणदणीत यश मिळवून तिने संपूर्ण जिल्ह्याची मान उंचावली आहे. निअलबगान येथील अवघ्या २७ वर्षांच्या मोहसिना इम्तियाज लस्कर यांनी मध्य आसाममधील होजाई जिल्ह्याची पहिली मुस्लीम महिला न्यायाधीश होण्याचा बहुमान मिळवला आहे. यासोबतच त्या आसाममधील सर्वात तरुण महिला मुस्लीम न्यायाधीशांपैकी एक ठरल्या आहेत.
गुवाहाटी उच्च न्यायालयाने घेतलेल्या आसाम ज्युडिशिअल सर्व्हिस (AJS) परीक्षा २०२६ च्या निकालात मोहसिना यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. ग्रेड-३ ज्युडिशिअल सर्व्हिससाठी त्यांची निवड झाली आहे. जाहीर झालेल्या निकालानुसार, संपूर्ण आसाममधून गुणवत्तेच्या आधारावर निवडलेल्या २२ उमेदवारांमध्ये मोहसिना यांनी ६ वा क्रमांक पटकावला आहे. आता त्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून सेवा बजावतील.
त्यांचे हे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा नाही, तर अजमल शैक्षणिक संस्थांसाठीही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अजमल लॉ कॉलेजशी त्यांचे नाते आधी एक विद्यार्थिनी म्हणून सुरू झाले आणि पुढे याच कॉलेजमध्ये त्या सहाय्यक प्राध्यापिका बनल्या. आता न्यायव्यवस्थेत प्रवेश करत त्यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाचा एक नवीन अध्याय सुरू केला आहे.
मोहसिना इम्तियाज लस्कर म्हणाल्या, "अजमल लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासूनच न्यायाधीश बनण्याचे माझे स्वप्न होते. सर्वप्रथम मी मौलाना बदरुद्दीन अजमल साहेब आणि सिराजुद्दीन अजमल साहेब यांचे आभार मानू इच्छिते, कारण त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आणि दूरवरच्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध करून दिली. आमच्या शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचेही मी आभार मानते. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मी आज या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले आहे."
मोहसिना यांनी २०२३ मध्ये अजमल लॉ कॉलेजमधून एलएलबीची (LLB) पदवी घेतली. त्यानंतर गुवाहाटी विद्यापीठातून एलएलएमचा (LLM) अभ्यासक्रम पूर्ण केला, जिथे २०२५ च्या परीक्षेत त्यांनी संपूर्ण विद्यापीठात प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला. शैक्षणिक क्षेत्रात अव्वल स्थान मिळवल्यानंतर त्यांनी अध्यापन क्षेत्रात पाऊल ठेवले. सध्या त्या अजमल लॉ कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
शिक्षण आणि अध्यापन या दोन्ही क्षेत्रांत यश मिळवल्यानंतर मोहसिना यांचे लक्ष न्यायव्यवस्थेत प्रवेश करण्यावर होते. आसाम ज्युडिशिअल सर्व्हिस परीक्षेत यश मिळवून त्यांनी हे कित्येक वर्षांचे स्वप्न पूर्ण केले. ग्रेड-३ ज्युडिशिअल सर्व्हिसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून झालेली ही निवड त्यांच्या कारकिर्दीतील एक मोठी उपलब्धी आहे. कायद्याचे शिक्षण, शैक्षणिक गुणवत्तेपासून ते अध्यापन आणि शेवटी न्यायव्यवस्थेत प्रवेश... असा त्यांचा हा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे.
अजमल संस्थेत जल्लोषाचे वातावरण
मोहसिना यांच्या यशाची बातमी पसरताच अजमल परिवार, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी २४ सप्टेंबर रोजी अजमल लॉ कॉलेजच्या प्रांगणात एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सत्कार समारंभापूर्वी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून मोहसिना यांचे स्वागत केले. ज्युडिशिअल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याच महाविद्यालयात एक यशस्वी माजी विद्यार्थिनी आणि विद्यमान प्राध्यापिका म्हणून परतणे, हा क्षण विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाचा होता.
त्यानंतर कॉलेज कॅम्पसमध्ये मुख्य सत्कार सोहळा पार पडला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कॉलेज प्रशासनाच्या वतीने मोहसिना यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभात अजमल फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. खुसरुल इस्लाम यांनी मोहसिना यांचे अभिनंदन केले.
त्यांच्या चिकाटी, मेहनत आणि बुद्धिमत्तेचे कौतुक करताना ते म्हणाले की, "मोहसिना यांचे हे यश येणाऱ्या पिढ्यांतील विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा देईल." दरम्यान, अजमल फाऊंडेशनचे ट्रस्टी मौलाना बदरुद्दीन अजमल आणि सिराजुद्दीन अजमल यांनीही मोहसिना इम्तियाज लस्कर यांना या उत्तुंग यशाबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्या.
नव्या पिढीसाठी प्रेरणेचा स्रोत
निअलबगानच्या या लेकीचे यश होजाई जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि तरुणांसाठी एक सकारात्मक संदेश घेऊन आले आहे. विशेषतः कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. कारण शिक्षणाकडून अध्यापनाकडे आणि अध्यापनाकडून न्यायव्यवस्थेकडे कशी वाटचाल करता येते, याचे हे एक जिवंत उदाहरण आहे.
त्यामुळे मोहसिना इम्तियाज लस्कर यांची ही गोष्ट केवळ एक स्पर्धा परीक्षा पास होण्याची कहाणी नाही. तर निअलबगानसारख्या भागातून शिक्षण, अभ्यास आणि अध्यापनाच्या जोरावर न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचलेली एक यशस्वी जीवनगाथा आहे; ज्या प्रवासाने आज या तरुण महिलेला होजाई जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासातील एका सुवर्णक्षणावर नेऊन ठेवले आहे.