महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम भाई-भाई - अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
मुस्लिम सत्यशोधक मंडळ
मुस्लिम सत्यशोधक मंडळ

 

पुणे: सध्या समाज आणि धर्मा-धर्मांत अगदी लहानसहान मुद्यांवरून वाद निर्माण होत आहेत. परंतु याला महाराष्ट्र राज्य अपवाद ठरले आहे. महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम हे दोन भिन्न समाज असून, ते एकोप्याने नांदत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम भाई-भाई असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असून, हे उदाहरण देशाला दिशा देणारे ठरत असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
 
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ५३ व्या वर्धापनदिन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी माजी खासदार अली अनवर अंसारी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी, डॉ. बेनझीर तांबोळी. रजिया सुलताना, प्रा. जमीर शेख, प्रा. सायरा मुलाणी, दिलावर शेख आणि पुरस्कार विजेत्या उपजिल्हाधिकारी वसीम शेख आदी उपस्थित होते. यावेळी मातोंडकर यांच्या हस्ते प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत उपजिल्हाधिकारी झालेल्या वसीमा शेख यांना सत्यशोधक फातिमाबी शेख कार्यगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
 
मातोंडकर पुढे म्हणाल्या, ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हमीद दलवाई यांनी समाजातील मागासलेल्या मुस्लीम समाजाला संघटित करून त्यांना मागासलेपणातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने सन १९७० मध्ये या मंडळाची स्थापना केली. यामुळे मुस्लिम समाज आणि या समाजातील महिलांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले. या व्यासपीठाच्या माध्यमातून मुस्लीम समाजातील अनिष्ट प्रथांना दूर करण्यासाठी एक चळवळ उभारली गेली. या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी मुस्लिम समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्या काळातील आणि आजच्या काळातील परिस्थितीत मोठा विरोधाभास आहे. मात्र महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समाजात सामाजिक एकोपा चांगला आहे. हाच सामाजिक एकोपा देशाला दिशा देण्याचे काम करत आहे.’
 
सध्या समाजात जाणीवपूर्वक विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी समाजाने जागृत होणे गरजेचे आहे. हिंदू आणि मुस्लीम या दोन समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा त्यांच्यात मानव जात ही संकल्पना रुजविणे गरजेचे आहे. तरच देशात सर्वधर्म समभाव राहील. महात्मा जोतिराव फुले, फातिमाबी शेख यांच्या कार्यामुळे आज महिला पुढे जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे देश एकसंध राहिला असल्याचे मत माजी खासदार अली अनवर अंसारी यांनी यावेळी व्यक्त केले.
 
राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. झहीर काझी यांची शिक्षण, समाज आणि वैद्यकीय क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल समाजप्रबोधन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. परंतु ते या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी मुस्लिम सत्यशोधक पत्रिका वर्धापनदिन विशेषांक आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ - एम्स- परस्पेक्टिव्ह अँड मॅनिफेस्टो’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बेनझीर तांबोळी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जमीर शेख यांनी आभार मानले.