जगात एवढी उलथापालथ सुरू असतानाही, भारत देतोय 'विश्वासाची आणि प्रगतीची' गॅरंटी!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
व्यापार आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे ऑस्ट्रियाच्या आपल्या समकक्षासोबत व्यापारविषयक चर्चा करताना
व्यापार आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे ऑस्ट्रियाच्या आपल्या समकक्षासोबत व्यापारविषयक चर्चा करताना

 

राजीव नारायण

आजकाल व्यापार म्हणजे फक्त 'बाजारपेठ' राहिलेली नाही; सगळा खेळ आता 'विश्वासावर' चालतो. जगात सध्या राजकारणावरून जी ओढाताण आणि गटबाजी सुरू आहे, त्यात केवळ स्वस्त माल देणारे देश नाही, तर ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येईल, असे देशच भविष्यात बाजी मारणार आहेत. भारतासाठी बघायला गेलं, तर ही २१ व्या शतकातील सर्वात मोठी संधी आहे.

भारताची वेगवान घोडदौड

आपली अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने पळतेय. जिथे जगभरात प्रगतीचा वेग ३ टक्क्यांवर अडकलाय, तिथे २०२६ मध्ये भारत ६ टक्क्यांच्या पुढे जाईल असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा (IMF) अंदाज आहे. पण भारताचा खरा फायदा फक्त या आकड्यांमुळे होणार नाहीये, तर तो जगाने आपल्यावर टाकलेल्या 'विश्वासावर' अवलंबून असणार आहे. सध्या जगात एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा वाढलीये. अशा वेळी जगाला असा जोडीदार हवाय जो फक्त कामच करणार नाही, तर भरवशाचाही (Dependable) असेल. आजकाल जागतिक निर्बंधांमुळे टॅक्स, तंत्रज्ञान आणि मालाचा पुरवठा यात सारखे अडथळे येतात. अशा अनिश्चिततेच्या काळात 'स्थिरता' देणारा भारत हा मोजक्याच देशांपैकी एक आहे.

संकटातून मिळालेली संधी

१९९१ च्या उदारीकरणानंतर आपली अर्थव्यवस्था ३०० अब्ज डॉलर्सवरून थेट ४ ट्रिलियन डॉलर्सच्या (सुमारे ३३० लाख कोटी रुपये) पार गेलीये. आता आपण जागतिक प्रगतीचं एक मुख्य इंजिन बनलोय. पण गेले काही दिवस जगासाठी सोपे नव्हते. आधी कोरोना आला, मग रशिया-युक्रेन युद्ध, पाठोपाठ अमेरिका-चीनमधील आर्थिक स्पर्धा आणि आता मध्यपूर्वेत सुरू असलेली तणावाची परिस्थिती! यामुळे समुद्रातून होणारा व्यापार आणि तेलपुरवठा धोक्यात आला. यातून जगाला आणि मोठ्या कंपन्यांना एकच धडा मिळाला की, 'राजकारण आणि अर्थकारण तुम्ही वेगळं करू शकत नाही.'

आता केवळ स्वस्ताई नाही, तर भरवसा महत्त्वाचा!

भारताच्या आर्थिक पाहणी अहवालातही याच बदलाचा उल्लेख आहे. आजकाल मोठ्या कंपन्यांचे निर्णय बदललेत. ते आता "सर्वात स्वस्त उत्पादन कुठे होईल?" हे बघत नाहीत, तर "आपले पैसे कुठे सुरक्षित राहतील आणि राजकीय धोका कुठे सर्वात कमी आहे?" हे बघतात. या बदलामुळे भारताचं पारडं जड झालंय. आज जागतिक प्रगतीत भारताचा वाटा जवळपास एक-षष्ठांश (१/६) आहे.

सर्वांशी सलोखा, हीच भारताची ताकद

भारतासारखे सर्वसमावेशक संबंध फार कमी देशांचे आहेत. आपण अमेरिकेशी मैत्री घट्ट केलीये, पण त्याच वेळी रशियासोबतचे जुने मैत्रीचे संबंधही टिकवून आहोत. आपण युरोप आणि जपानसोबत व्यापार वाढवतोय, आखाती देशांकडून तेल घेतोय आणि आफ्रिकेतही आपली पोहोच वाढवतोय. चीनसोबत सीमेवर तणाव असला, तरी आपला व्यावसायिक व्यवहार सुरूच आहे. ही आपली मजबुरी नाही, तर जमेची बाजू आहे! आपली निर्यात आज ९०० अब्ज डॉलर्सच्या आसपास पोहोचलीये आणि परकीय चलन (Forex) ७०० अब्ज डॉलर्सवर आहे, जे देशाला कोणत्याही संकटात सावरण्यासाठी पुरेसे आहे.

भारताचा 'डिजिटल' डंका

भारत फक्त 'तटस्थ' नाही, तर आपण सगळ्यांसोबत काम करण्याचे पर्याय खुले ठेवले आहेत. आणि आपला पाया आता खूप भक्कम झालाय. आपलं 'आधार' (Aadhaar) आणि 'यूपीआय' (UPI) बघून जग थक्क झालंय. आज १४० कोटी भारतीयांकडे आधार आहे आणि UPI वरून दर महिन्याला २००० कोटी व्यवहार होतात! याशिवाय, सरकारच्या PLI योजनेमुळे मोबाईल, गाड्या आणि औषध निर्मितीत मोठी गुंतवणूक येत आहे. आज आपण दरवर्षी २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे मोबाईल परदेशात विकतोय. आपल्याला आता फक्त 'फॅक्टरी' नाही बनायचं, तर जगाचा 'सर्वात भरवशाचा साथीदार' बनायचंय.

परदेशी गुंतवणुकीचा ओघ

सध्या गुंतवणुकीसाठी आशिया खंड जगात सर्वात 'भारी' मानला जातोय आणि त्यातही भारताला सर्वाधिक पसंती मिळतेय. जगात थोडं मंदीचं वातावरण असतानाही भारतात ४० अब्ज डॉलर्सहून अधिक परकीय गुंतवणूक (FDI) येतेय.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, परदेशी कंपन्या आता फक्त 'माल बनवायला' भारतात येत नाहीत. ते इथे रिसर्च (R&D), इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाची मोठी कामे घेऊन येत आहेत. आज भारतात १७०० हून अधिक परदेशी कंपन्यांची मोठी ऑफिसेस (GCCs) आहेत, जिथे आपले २० लाखांहून अधिक तरुण काम करत आहेत.

भारताची जमेची बाजू आणि भविष्य

स्वित्झर्लंड बँकिंगसाठी, सिंगापूर व्यापारासाठी आणि दुबई बिझनेस हब म्हणून प्रसिद्ध झालं, कारण त्यांनी जगाचा विश्वास जिंकला. भारताला त्यांची कॉपी करण्याची गरज नाही. आपला मोठा देश, तंत्रज्ञानातील हुशारी, मोठी बाजारपेठ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली 'तरुण पिढी' (सरासरी वय फक्त २९ वर्षे), हे आपले असे फायदे आहेत जे इतर कोणाकडेच नाहीत.

जरा विचार करा:

  • अमेरिकेला आपल्यासोबत तंत्रज्ञानात काम करायचंय.

  • रशिया शस्त्रांसाठी सोबत आहे.

  • युरोप व्यापार वाढवू पाहतोय.

  • जपान इथे रस्ते आणि पूल बांधण्यात गुंतवणूक करतोय.

  • आपले १ कोटी भारतीय आखाती देशांमध्ये काम करून देशाला मोठा पैसा पाठवत आहेत.

थोडक्यात सांगायचं तर...

२०४७ पर्यंत आपल्याला 'विकसित भारत' बनायचं असेल, तर नुसता विकास दर (GDP) वाढून चालणार नाही. आपल्याला जगाच्या अर्थव्यवस्थेचा असा भाग बनावं लागेल, ज्याच्याशिवाय जगाचं पानही हलणार नाही. जगात जेव्हा दोन गट पडून एकमेकांवर कुरघोडी सुरू असते, तेव्हा भारत असा एकमेव 'सुरक्षित किनारा' बनून उभा राहतो, जिथे जग बिनधास्तपणे आणि विश्वासाने आपला व्यापार करू शकतं!

(लेखक हे एक ज्येष्ठ पत्रकार आणि जनसंपर्क विशेषज्ञ आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter