अल्पसंख्याकांनी आत्मचिंतन करावे - डॉ. शमसुद्दीन तांबोळी

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 1 Months ago
मसाप आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. शमसुद्दीन तांबोळी
मसाप आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. शमसुद्दीन तांबोळी

 

'प्राचीन भारताचे आधुनिक राष्ट्रात रुपांतरण होणे हे संविधानाचे मुख्य ध्येय आहे. 'आजही आपल्या देशात जुन्या अनिष्ट प्रथा सर्रास आचरणात दिसतात. इस्लाममध्ये कालसापेक्ष बदल आणि सुधारणा करण्याची तरतूद आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. इस्लामधर्मीय बांधवांनी आत्मसुधारणेसाठी आत्मचिंतन व आत्मचिकित्सा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे येथील मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समिती सदस्य प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी केले. 

येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे आयोजित राष्ट्रसंत गाडगेबाबा व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेच्या कर्मचारी पतपेढीच्या सभागृहात आयोजित व्याख्यानाला 'मसाप' शाखेचे अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप, उपाध्यक्ष गणेश आढाव, कार्याध्यक्ष मनोहर आंधळे, प्रमुख कार्यवाह नितीन खंडाळे, कोषाध्यक्ष रामचंद्र गोसावी, शाखा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुनील राजपूत, कार्यकारी विश्वस्त किसनराव जोर्वेकर हे मंचावर उपस्थीत होते. डॉ. तांबोळी यांनी सांगितले, की समान नागरी कायदा हा सर्वधर्मीय महिलांना सुयोग्य न्याय देणारा कायदा असून पुरोगामी समाज सुधारणेस बळकटी देणारा आहे. 

आपल्या संविधानात सर्वांना आपापल्या धर्म रितीरिवाजाप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र, धर्मस्वातंत्र्य हे अमर्यादित नाही. शांतता, सुव्यवस्था, सामाजिक आरोग्य, संविधानात्मक सुधारणेस धर्मस्वातंत्र्य अडथळा ठरू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी कवी मनोहर आंधळे यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद केले. प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांच्यासह प्रायोजक प्रा. जयसिंग बागूल व प्रतिभा बागूल यांचा सत्कार करण्यात आला. नितीन खंडाळे यांनी परिचय करून दिला. 

शालिग्राम निकम यांनी सूत्रसंचालन तर विजय कदम यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी अशोक ब्राह्मणकार, बी. एल. ठाकरे, प्रा. अशोक वाबळे, प्रतिभा बागूल, जी. एन. ढगे, सुधीर देवरे, आकाश धुमाळ, भाऊसाहेब वाघ, सुधीर पाटील, शिवाजी साळुंखे यांचे सहकार्य लाभले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Channel 

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter